25.9 C
Gondiā
Thursday, August 20, 2026
Home विदर्भ नवेगावबांध येथे उद्या ‘पुस्तकांच्या गावा’चे लोकार्पण; पण राजकीय राजकारणाने वातावरण तापले!

नवेगावबांध येथे उद्या ‘पुस्तकांच्या गावा’चे लोकार्पण; पण राजकीय राजकारणाने वातावरण तापले!

0
2
  • जिल्हा परिषद क्षेत्रातील लोकप्रतिनिधींना डावलल्याचा आरोप

  • नगरपंचायतीचे क्षेत्र नसताना अर्जुनी मोरगावच्या नगराध्यक्षांना निमंत्रणपत्रिकेत स्थान का? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

गोंदिया,दि.२० (विशेष प्रतिनिधी): वाचन संस्कृतीचा प्रसार आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध येथे साकारण्यात आलेल्या ‘पुस्तकांच्या गावा’चा भव्य लोकार्पण सोहळा उद्या, शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात पार पडणार आहे. राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार असून, पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्यासह अनेक खासदार व आमदारांची उपस्थिती लाभणार आहे. मात्र, या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमंत्रणपत्रिकेवरून सध्या स्थानिक राजकीय वर्तुळात नवा वाद उफाळून आला असून, अंतर्गत राजकारणाची जोरदार चर्चा रंगली आहे.

जिल्हा परिषद सदस्यांना डावलल्याने संताप हा संपूर्ण लोकार्पण सोहळा नवेगावबांध या ग्रामीण व जिल्हा परिषद क्षेत्राच्या हद्दीत होत आहे. नियमानुसार स्थानिक ग्रामपंचायत प्रतिनिधींसोबतच संबंधित जिल्हा परिषद क्षेत्रातील सदस्यांचे नाव निमंत्रणपत्रिकेत असणे आवश्यक होते. मात्र, या निमंत्रणपत्रिकेत स्थानिक जिल्हा परिषद सदस्यांना पूर्णपणे डावलण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

नगरपंचायतीचे क्षेत्र नसताना नगराध्यक्षांना स्थान कशासाठी? नवेगावबांध हे गाव अर्जुनी मोरगाव नगरपंचायतीच्या हद्दीत येत नाही. असे असतानाही अर्जुनी मोरगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. मंजुषा बारसागडे यांचे नाव निमंत्रणपत्रिकेत विशेष निमंत्रित म्हणून का टाकण्यात आले? असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. ज्या लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघात आणि जि. प. क्षेत्रात हा कार्यक्रम होत आहे, त्यांना वगळून इतर नगरपंचायतीच्या अध्यक्षांना स्थान देण्यामागे कोणता राजकीय हेतू आहे, अशी जोरदार चर्चा आता संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात सुरू झाली आहे.

साहित्य सोहळ्यावर राजकीय सावट मराठी भाषेच्या आणि पुस्तकांच्या प्रसारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा सोहळा प्रशासकीय आणि राजकीय विसंवादामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. प्रशासनाकडून प्रोटोकॉल पाळण्यात आलेल्या या त्रुटींमुळे स्थानिक जि. प. सदस्यांच्या समर्थकांमध्ये असंतोष पसरला असून, उद्या होणाऱ्या या सोहळ्याच्या ऐन पार्श्वभूमीवर या राजकीय वादाचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.