; शाळांमधील धूळखात पडलेल्या प्रयोगशाळांवरून प्रशासकीय अनास्था उघड
तात्काळ समायोजन व वेतन न मिळाल्यास कायदेशीर दाद मागण्याचा इशारा; शिक्षण संचालकांकडून चौकशीची मागणी
तुमसर (प्रतिनिधी): नगर परिषद माकडे विद्यालय, तुमसर येथील शिक्षकांचे समायोजन नेहरू विद्यालयात तात्काळ करण्यात आले असले, तरी त्याच शाळेतील प्रयोगशाळा परिचर (चतुर्थ श्रेणी कर्मचारी) सतीश हरीभाऊ मलेवार यांचे समायोजन मात्र मागील तीन महिन्यांपासून जाणीवपूर्वक रोखून धरण्यात आले आहे. स्थानिक आणि जिल्हा स्तरावर सुटू शकणारा हा प्रश्न केवळ जबाबदारी ढकलण्याच्या वृत्तीमुळे थेट नागपूर शिक्षण उपसंचालकांकडे पाठवून वेळकाढूपणा केला जात असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात प्रयोगशाळा परिचरांकडे दुर्लक्ष!
आजचे युग विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे मानले जाते; परंतु प्रत्यक्षात शिक्षण विभाग मागील आठ-दहा वर्षांपासून प्रयोगशाळा परिचर या अत्यंत महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. तुमसर शहर व तालुक्यातील अनेक शाळांमध्ये प्रयोगशाळा अस्तित्वातच नाहीत आणि ज्या ठिकाणी आहेत, त्या धूळखात पडून आहेत.
त्यामुळे शाळांमधील विज्ञान शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ ‘कागदी प्रयोगांचे’ ज्ञान देत आहेत. ही अत्यंत गंभीर बाब माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना भलीभांती माहीत असूनही याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी राज्याच्या शिक्षण संचालकांकडून (राज्य स्तर) करण्याची जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.
तीन महिन्यांपासून वेतन बंद; कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ
समायोजन प्रलंबित राहिल्यामुळे सतीश मलेवार यांना मागील तीन महिन्यांपासून एक रुपयाचेही वेतन मिळालेले नाही. यामुळे त्यांच्या कुटुंबाचा दैनंदिन उदरनिर्वाह, वृद्ध आईचा औषधोपचार आणि मुलांचे शैक्षणिक शुल्क भरणे कठीण झाले आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यावर ओढावलेल्या या बिकट परिस्थितीमुळे संपूर्ण कुटुंब आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहे.
शिक्षकांना एक न्याय आणि कर्मचाऱ्याला दुसरा?
माकडे विद्यालयातील चार शिक्षकांचे समायोजन तातडीने केले जाते, परंतु एका प्रयोगशाळा परिचरासाठी मात्र नियम आणि मार्गदर्शनाची ढाल पुढे केली जात आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याच्या समायोजनासाठी नागपूर उपसंचालकांकडे प्रस्ताव पाठवून मार्गदर्शन मागण्याची कोणतीही प्रशासकीय आवश्यकता नसताना, केवळ वेळकाढूपणा करण्यासाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद भंडारा आणि नगर परिषद तुमसर प्रशासन टोलवाटोलवी करत आहे.
तात्काळ कारवाई न झाल्यास वरिष्ठांकडे तक्रार व कायदेशीर मार्ग!
या संदर्भात शिक्षण विभागाला दिलेल्या निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. “सतीश मलेवार यांचे तात्काळ समायोजन करून त्यांचे थकीत ३ महिन्यांचे वेतन अविलंब अदा न केल्यास आणि प्रयोगशाळांची दुरवस्था न थांबवल्यास, या अन्यायाविरोधात उच्च प्रशासकीय स्तरावर तक्रार नोंदवून सनदशीर व कायदेशीर मार्गाने योग्य ती दाद मागण्यात येईल,” असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
”शिक्षकांचे समायोजन लगेच केले जाते आणि एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला तीन महिने वेतनाविना ठेवले जाते, ही प्रशासनाची हुकूमशाही आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात शाळांमधील प्रयोगशाळा धूळखात पडून आहेत आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल केली जात आहे. शिक्षण विभागाने तात्काळ सतीश मलेवार यांचे समायोजन करून थकीत वेतन न दिल्यास या अन्यायाविरोधात सनदशीर मार्गाने योग्य ती दाद मागितली जाईल.”
— चरण वाघमारे, माजी आमदार, तुमसर-मोहाडी विधानसभा मतदारसंघ.
”मागील तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे कुटुंबाचा सांभाळ करणे, आईचा औषधोपचार आणि मुलांची शाळा-कॉलेजची फी भरणे अशक्य झाले आहे. एका बाजूला शिक्षकांचे समायोजन त्वरित केले जाते, तर दुसऱ्या बाजूला माझ्यासारख्या अल्पवेतनावरील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला मात्र तीन-तीन महिने वेतनापासून वंचित ठेवून त्रास दिला जात आहे. प्रशासनाने आमची ही हलाखीची परिस्थिती लक्षात घेऊन तात्काळ समायोजन करून थकीत वेतन अदा करावे.”
— सतीश मलेवार, पीडित प्रयोगशाळा परिचर, माकडे विद्यालय तुमसर.
प्रयोगशाळा परिचर पदावरून प्रयोगशाळा सहायक पदी स्थानांतरण/समायोजन करता येईल का, याबद्दल शिक्षण उपसंचालक (नागपूर विभाग) यांनी योग्य ते मार्गदर्शन व मान्यता द्यावी, जेणेकरून त्यांच्या थकीत व नियमित वेतनाचा प्रश्न कायमचा सुटू शकेल.
–करणकुमार चव्हाण, मुख्याधिकारी, नगरपरिषद तुमसर.





