*राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाबाभाऊ बोपचे यांचा शैक्षणिक उपक्रम; अंगणवाडीपासून सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळाला मदतीचा हात*
गोरेगाव : तालुक्यातील आंबेतलाव येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाबाभाऊ बोपचे यांच्या स्वखर्चातून शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले.
शाळेतील अंगणवाडी क्रमांक १, अंगणवाडी क्रमांक २ तसेच इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या एकूण १३६ विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात अधिक सक्षमपणे पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
बाबाभाऊ बोपचे यांच्या या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाचे गावकऱ्यांकडून कौतुक करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बाबाभाऊ बोपचे म्हणाले की, “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.शिक्षणाच्या माध्यमातूनच समाजातील प्रत्येक घटकाला प्रगतीची दिशा मिळू शकते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि मेहनतीच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, खासदार राजेंद्र जैन, आमदार राजकुमार बडोले तसेच तालुका अध्यक्ष केवलभाऊ बघेले हे पक्षातील वरिष्ठ नेते आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर असल्याचे बाबाभाऊ बोपचे यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील शिक्षण, सामाजिक विकास आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.शाळेतील विद्यार्थ्यांना बॅगचे वाटप होत असताना विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करत बाबाभाऊ बोपचे यांचे आभार मानले.
आर्थिकदृष्ट्या सर्वच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य सहज उपलब्ध होईलच असे नाही. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत करण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे.
कार्यक्रमाला योगेश चौधरी, बाबा यावलकर, गुड्डू भगत, ओमकार चौधरी, हेमचंद चौधरी,बबलू तुरकर, हिवराज बडगे, उमेश्वर कटरे,शाळेचे मुख्याध्यापक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी, गावातील नागरिक, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंबेतलावसारख्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांना हातभार लावणारा हा उपक्रम केवळ बॅग वाटपापुरता मर्यादित न राहता ‘शिक्षणासाठी समाजाची साथ’ हा सकारात्मक संदेश देणारा ठरला.विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण झाले होते.





