कुटुंबीयांचा मरणोत्तर नेत्रदानाचा प्रेरणादायी निर्णय
गरजूंच्या आयुष्यात प्रकाशाची आशा
वाशिम, दि. २१ ऑगस्ट – मृत्यू हा जीवनाचा शेवट असला, तरी माणुसकीचा अंत होऊ नये, याचा आदर्श हिंगोली जिल्ह्यातील फाळेगाव येथील रहिवासी संदीप टोंचर यांच्या कुटुंबीयांनी घालून दिला आहे. संदीप टोंचर यांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी दुःखाच्या प्रसंगी धैर्याने निर्णय घेत त्यांचे मरणोत्तर नेत्रदान केले. या नेत्रदानातून गरजू व्यक्तींच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश येण्याची आशा निर्माण झाली आहे.
जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना नेत्रदानाचा निर्णय घेणे निश्चितच सोपे नसते. मात्र टोंचर कुटुंबीयांनी भावनिक दुःखावर मात करत सामाजिक बांधिलकी जपली. त्यांच्या या निर्णयामुळे नेत्रदानाचे महत्त्व अधोरेखित होण्यासोबतच समाजात नेत्रदानाबाबत जनजागृती निर्माण होण्यास मदत होणार आहे.
दुःखाच्या प्रसंगी घेतला समाजोपयोगी निर्णय
संदीप टोंचर यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या जिवलग व्यक्तीच्या डोळ्यांमधून एखाद्या गरजू व्यक्तीच्या आयुष्यात प्रकाश आणता येत असेल, तर त्यापेक्षा मोठी श्रद्धांजली कोणती, या भावनेतून नेत्रदानाचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे संदीप टोंचर यांच्या स्मृती कायम राहण्यासोबतच इतरांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण होणार आहे.
नेत्रदानातून मिळणाऱ्या कॉर्नियाचा उपयोग कॉर्नियाशी संबंधित अंधत्व असलेल्या व्यक्तींच्या दृष्टी पुनर्स्थापनेसाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे नेत्रदान हे केवळ दान नसून मानवतेची सेवा आणि मृत्यूनंतरही समाजासाठी योगदान देण्याचा एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या पथकाकडून नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण
टोंचर कुटुंबीयांची अंतिम इच्छा जिल्हा रुग्णालयातील पथकाने पूर्ण केली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अविनाश पुरी आणि नेत्रशल्यचिकित्सक डॉ. आशिष बेदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रदान समुपदेशक रमेश ठाकरे, नेत्रचिकित्सा अधिकारी सुधीर साळवे आणि ऋतिक भूत यांनी मरणोत्तर नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली. नेत्रबुबुळे त्याच वेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथे पाठविण्यात आली.या नेत्रदानासाठी गणेश प्रभाकर गावंडे, विष्णू साहेबराव पातळे, अशोक सोपान पातळे, प्रवीण विश्वनाथ वैद्य, डॉ. आश्विन हाके आणि प्रवीण ढोके यांनी विशेष प्रयत्न केले.
नेत्रदान चळवळ लोकचळवळ व्हावी
समाजातील सर्व घटकांतील नागरिकांनी नेत्रदान चळवळीत सक्रिय सहभाग घेऊन ही चळवळ लोकचळवळ बनवावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी केले. मृत्यूनंतर जवळच्या व्यक्तीचे शक्य तितक्या लवकर नेत्रदान घडवून आणावे आणि नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अंत्यसंस्कार करावेत, असेही त्यांनी सांगितले. टोंचर कुटुंबीयांनी घेतलेल्या या प्रेरणादायी निर्णयाबद्दल त्यांनी कुटुंबाचे आभार मानले.





