स्वप्नपूर्ती संस्थेच्या ‘ऑफिसर्स टॉक’ कार्यक्रमात पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांचे प्रतिपादन
लाखनी :
स्पर्धा परीक्षेच्या जगात अभ्यासात सातत्य आणि प्रामाणिकपणा महत्वाचे असतो. सातत्य कायम ठेवून ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील यामध्ये मोठे यश मिळवू शकतो. यासाठी शालेय वयापासून नियमित वाचन करणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन भंडारा जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, करिअर आणि प्रशासकीय सेवांबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे, तसेच यशस्वी अधिकाऱ्यांचा थेट संवाद विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावा, या उद्देशाने स्वप्नपूर्ती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ‘ऑफिसर्स टॉक’ या उपक्रमाचे आयोजन लाखनी करण्यात आले. यामध्ये झालेल्या प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. जवळपास दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात स्पर्धा परीक्षेची तयारी, अभ्यासाचे तंत्र व नियोजन, ‘प्लॅन बी’ आणि एकविसाव्या शतकातील आव्हाने अशा विविध विषयांवर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दिल्लीस्थित पत्रकार प्रशांत वाघाये यांनी नुरुल हसन यांच्याशी संवाद साधला.

• कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला लाखनीच्या तहसीलदार शीतल घावटे, अतिरिक्त खंड विकास अधिकारी प्रशांत पोशेट्टी, सहायक पोलीस निरीक्षक अचल कपूर, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष बावनकुळे, जिल्हा परिषद सदस्या डॉ. मनिषा निंबार्ते, डॉ. स्वाती वाघाये, ज्येष्ठ साहित्यिक प्रल्हाद सोनेवाणे, डॉ. चंद्रकांत निंबार्ते, माजी जिल्हा परिषद जयकृष्ण फेंडरकर, वृषाली खेडीकर, मुख्याध्यापक संजय वनवे, उद्योजक विनोद भुते उपस्थित होते.
ऑफिसर्स टॉक या कार्यक्रमात नुरुल हसन यांनी त्यांच्या वैयक्तिक प्रवासापासून यूपीएससीची तयारी, आयपीएस म्हणूनचा अनुभव, पोलिसिंगमधील बदल, नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि विद्यार्थ्यांसमोरील विविध आव्हाने अशा विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर जवळपास अर्धा तास विविध शाळा, महाविद्यालये आणि अभ्यासिकांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी पोलीस अधीक्षकांना थेट प्रश्न विचारले. हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारले, तर हसन यांनीही त्यांना आत्मीयतेने उत्तरे दिली.
चौकट: “नियमित वर्तमानपत्र वाचन महत्वाचे”
कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयार करताना अभ्यास करणे महत्त्वाचे आहेच. मात्र लहानपणापासून नियमितपणे वर्तमानपत्र वाचणे खूप महत्त्वाचे असते. अत्यंत महत्त्वाची माहिती दररोज वर्तमानपत्रात येत असते. नियमित वर्तमानपत्र वाचनामुळे ताज्या घडामोडी, सामान्य ज्ञान या बाबी कळत असतात. विविध लेख, वैज्ञानिक माहिती आणि इतर माहितीपर गोष्टी देखील असतात. सोबतच स्पर्धा परीक्षा देताना शक्यतो व्यावसायिक पदवी मिळवा, समाज माध्यमांचा वापर मर्यादित आणि चांगल्या गोष्टींसाठी करा, अभ्यास करताना वाचन, चिंतन करा, असाही संदेश नुरुल हसन यांनी दिला.
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा संवाद
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे. मात्र या क्षमतेला योग्य मार्गदर्शन आणि प्रेरणेची जोड मिळणे आवश्यक आहे. एखाद्या यशस्वी अधिकाऱ्याला प्रत्यक्ष ऐकण्याची आणि त्यांना प्रश्न विचारण्याची संधी विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा देऊ शकते, या भूमिकेतून हा उपक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला लिटिल फ्लॉवर स्कूल लाखनी, युनिव्हर्सल स्कूल लाखनी, जि. प. गांधी विद्यालय लाखनी, निर्धनराव पाटील वाघाये महाविद्यालय लाखनी, सिद्धार्थ विद्यालय सावरी, ज्ञानेश्वर विद्यालय सालेभाटा, नवचैतन्य विद्यालय शिवणी, शिवनेरी अभ्यासिका, स्वराज्य अभ्यासिका, स्वप्नपूर्ती पोलिस अकादमी येथील विद्यार्थी उपस्थित होते. सोबतच लाखनीसह मुरमाडी, सावरी, केसलवाडा, लाखोरी, सालेभाटा, शिवणी, मोगरा, सिपेवाडा, रेंगेपार, सोमलवाडा, पिंपळगाव, मानेगाव आणि पोहरा आदी परिसरातील विद्यार्थी उपस्थित होते. काही विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांना पहिल्यांदाच प्रत्यक्ष पाहिले आणि त्यांच्याशी संवाद साधला. कार्यक्रमभर विद्यार्थ्यांची दिसून आलेली तल्लीनता आणि उत्स्फूर्त सहभाग लक्षवेधी ठरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अंगेश बेहलपांडे यांनी केले. विशाल हटवार यांनी प्रास्ताविक केले, तर भीष्म लांडगे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका प्रशासनाने मौल्यवान सहकार्य केले. तसेच स्वप्नपूर्ती बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी सुधीर काळे, लिखित पुडके, निलेश राऊत, दुर्गेश टिचकले, नितेश टिचकुले, सोहम आगाशे, अनिकेत नगरकर, मिनाक्षी सिंगणजुडे आणि कोमल वाघाये यांनी परिश्रम घेतले. संस्थेचे सल्लागार किशोर वाघाये, अतुल पाटील भांडारकर आणि संजय वनवे यांनीही कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आवश्यक सूचना आणि मार्गदर्शन केले. लिटिल फ्लॉवर इंग्लिश स्कूल, स्वागत सेलिब्रेशन आणि हरिहर ट्रेडर्स यांनाही या उपक्रमाला सहकार्य केले.




