24.8 C
Gondiā
Friday, August 21, 2026
Home विदर्भ पाणी व माती संवर्धनासाठी गोंदियाकरांची एकजूट ; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

पाणी व माती संवर्धनासाठी गोंदियाकरांची एकजूट ; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

0
8

‘महा वॉकॅथॉन – वॉक फॉर वॉटर’मधून जलसंधारणाचा संदेश

गोंदिया,दि.२१ ऑगस्ट : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.सुधाकररावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन साजरा करण्यात आला.पाणी आणि माती संवर्धनाची चळवळ केवळ सरकारी उपक्रम न राहता ती जनमानसाची चळवळ व्हावी, या उद्देशाने गोंदिया येथे ‘महा वॉकॅथॉन – वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले.सकाळच्या प्रसन्न वातावरणात नागरिक, विद्यार्थी,अधिकारी- कर्मचारी, खेळाडू तसेच विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने जलसंधारणाच्या संदेशाला लोकसहभागाची जोड मिळाली.

गोंदिया येथे आज शुक्रवार,२१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता जयस्तंभ चोक येथून वॉकॅथॉनला उत्साहात सुरुवात झाली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर,माजी जि.प.अध्यक्ष पंकज रहागंडाले, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेनिथ चंद्रा दोंन्तूला,अति. जिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.तानाजी लोखंडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतिरकर, विजय लोंढे, कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी सत्यजीत राऊत, सहा.जिल्हा जलसंधारण अधिकारी आदित्य राऊळवार, श्रीमती स्वाती तुरकर, जिल्हा परिषद सिंचन उपविभागाचे उप विभागीय अभियंता विजय माळी, विशाल पिंपळे, सुमित नागदेवे, कु.शुभदा अष्टूळ, मृद व जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंता  मडावी,  वसंत राऊत श्रीमती सोनाली ढोके,यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी मुख्यमंत्री स्व.सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सहभागी नागरिकांना मृदा व जलसंधारणाची शपथ देण्यात आली. गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जेनित चंद्रा दोंन्तूला यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून वॉकॅथॉनला सुरुवात करण्यात आली.

जयस्तंभ चौकातून सुरु झालेली वाकथाॅन शिवधाम,फुलचूर येथे पोहोचली. या मार्गावर जलसंधारण,पाणी बचत आणि माती संवर्धनाचा संदेश देत सहभागी नागरिकांनी उत्साहाने वॉकॅथॉन पूर्ण केली. शिवधाम येथे जलपुजन करण्यात आले वाॅकथाॅन मध्ये सहभागी असलेल्या नागरिकांसह शाळा- महाविद्यालयीन विद्यार्थी,विविध शासकीय विभागांचे अधिकारी- कर्मचारी, संस्था व संघटनांचे पदाधिकारी यांना प्रशस्तीपत्र वाटप करण्यात आले सर्व उपस्थितांकरीता चहा-नास्ता ची व्यवस्था करण्यात आली.

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संदेश

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर  म्हणाले की,पाण्याचे संवर्धन,भूजलपातळी वाढविणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ‘पाणी अडवा,पाणी जिरवा’ हा मूलमंत्र आहे.या माध्यमातून जलसंधारणाची कामे लोकसहभागातून व्यापक स्वरूपात राबविणे आवश्यक आहे.पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे तसेच जलस्रोतांचे पुनरुज्जीवन केल्याने भूजलपातळी वाढण्यास आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवण्यास मदत होते.पाण्याचा वापर प्रत्येकाने गरजेनुसार आणि काटकसरीने करणे ही काळाची गरज आहे.२६ जानेवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या पाणी संवर्धनाच्या विविध उपक्रमांमध्ये नागरिकांनी अधिकाधिक सहभागी व्हावे,असे आवाहनही  यांनी केले.

प्रास्ताविकात जिल्हा जलसंधारण अधिकारी इंजी.सत्यजीत राऊत यांनी जलसंधारण अभियानांतर्गत विविध स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती दिली.ग्रामीण भागात जलसंधारणाची चळवळ अधिक व्यापक करणे,लोकसहभाग वाढविणे आणि पाण्याची बचत करणे हा अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार’ या उपक्रमामुळे दीर्घकालीन फायदे झाल्याचेही  यांनी सांगितले.

प्रथम पंधरा सहभागींचा गौरव

‘महा वॉकॅथॉन – वॉक फॉर वॉटर’मधील प्रथम दहा सहभागी विजेत्यांना मानचिन्ह प्रमाणपत्र,पदक देऊन अध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभि. देवेंद्र रोडगे यांनी केले,तर आभार अभि.आदित्य राऊळवार  यांनी मानले. पाणी आणि मातीचे संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे,हा संदेश या वॉकॅथॉनच्या माध्यमातून गोंदियाकरांना प्रत्यक्ष सहभागातून अधोरेखित केला.