ग्रामपंचायत कार्यालयात जलपूजन; NDKSP 2.0 व कृषी योजनांवर मार्गदर्शन
आमगाव,दि.२२: तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय, मौजा खुर्शिपार येथे जलपूजन करून जलसंधारण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम श्रीमती रेखाताई नुतन बोपचे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.या प्रसंगी श्री. शहारे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचे कॉर्डिनेटर रविकांत घरडे, सहाय्यक कृषी अधिकारी श्री. बिरनवार, सौ. रोशनी कटरे, श्री. खुशाल व श्री. वासनिक यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी उपस्थितांना पाण्याचे महत्त्व, पाण्याचा काटकसरीने वापर, जलसंधारणाची गरज आणि शेती विकासासाठी शासनाच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमातील प्रमुख मुद्दे:पाणी अडवा, पाणी जिरवा: संकल्पनेवर सविस्तर चर्चा करून गावात जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन करण्यात आले.जलसंवर्धनाची शपथ: उपस्थितांनी जलसंधारण दिनानिमित्त पाण्याचा थेंब अन् थेंब वाचवण्याची शपथ घेतली.योजनांचे मार्गदर्शन: NDKSP 2.0 योजना आणि P-CBDC बाबत सविस्तर माहिती देण्यात आली.कृषी विकास संधी: कृषी अवजारे बँक, गोदाम उभारणी व प्रोसेसिंग युनिटबाबत उपलब्ध संधी व शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य, ग्राम कृषी विकास समितीचे सदस्य, शेतकरी बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. “पाणी आहे तरच शेती आहे, आणि शेती आहे तरच गाव समृद्ध आहे!” हा संदेश देत जलसंधारण व गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सामूहिक प्रयत्न करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.कार्यक्रम प्रसंगी आभार प्रदर्शन सौ. रोशनी कटरे यांनी केले.





