24.4 C
Gondiā
Saturday, August 22, 2026
Home विदर्भ सफाई कामगारांचे प्रलंबित वेतन रक्षाबंधनाच्या पूर्वी अदा करा

सफाई कामगारांचे प्रलंबित वेतन रक्षाबंधनाच्या पूर्वी अदा करा

0
6

तुमसर नगरपरिषद प्रशासनाला कामगारांचा निवेदनाद्वारे इशारा

तुमसर (प्रतिनिधी): तुमसर नगरपरिषदेतील सफाई कामगारांचे गेल्या दोन महिन्यांपासून प्रलंबित असलेले वेतन आगामी रक्षाबंधन सणापूर्वी त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे, तसेच इतर न्याय्य मागण्यांचा तात्काळ निपटारा करण्यात यावा, या मागणीसाठी स्वराज्य युवा एकता फाऊंडेशनच्या वतीने तुमसर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन व संप पुकारण्याचा थेट इशारा फाऊंडेशनचे अध्यक्ष अमित मेश्राम यांनी दिला आहे.
निवेदनानुसार, शहराची स्वच्छता राखून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सफाई कामगारांच्या मूलभूत हक्कांकडे नगरपरिषद प्रशासन दुर्लक्ष करत आहे. आगामी रक्षाबंधन हा सण तोंडावर असताना कामगारांचे दोन महिन्यांचे वेतन थकीत असल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे.

शासनाच्या लाड-पांगे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना ३० दिवसांच्या आत नियुक्ती देण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही प्रशासनाकडून प्रकरणांचा निपटारा करण्यात दिरंगाई होत असल्याचे निवेदनात नमूद आहे.
नियमित कर्मचाऱ्यांचे वेतन व सेवानिवृत्तांचे निवृत्तीवेतन दरमहा १ ते १० तारखेच्या आत अदा करण्यात यावे आणि प्रलंबित वेतन रक्षाबंधनाच्या पूर्वी देण्यात यावे. शासन निर्णयानुसार वारसांना ३० दिवसांच्या आत तातडीने नियुक्ती देण्यात यावी व प्रलंबित प्रकरणे पुनरुज्जीवित करून त्वरित पाठपुरावा करावा. जवळपास १५० सफाई कामगारांना उच्च दर्जाचे गणवेश, बूट, हातमोजे, मास्क, झाडू, घमेले, पावडे व इतर आवश्यक साहित्य पुरवण्यात यावे. तसेच कवलेवाडा पंप गृह येथे कर्मचाऱ्यांसाठी खोली व सचोलयाची सोय करण्यात यावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेअंतर्गत पात्र सफाई कामगारांना त्वरित घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा. कर्मचारी सेवानिवृत्त होताच त्यांच्या निवृत्तीचे सर्व आर्थिक लाभ त्याच दिवशी प्रदान करण्यात यावेत.

सफाई कामगारांच्या रास्त मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास येणाऱ्या काळात संप पुकारला जाईल आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस सर्वस्वी नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील, असा स्पष्ट इशारा कामगार प्रतिनिधींनीच्या माध्यमातून स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे. यावेळी सफाईगार जगदीश खांडेकर, मनीष राणे, अजय शेंदरे, दुर्गेश खांडेकर, विनोद बघेल, सुशील राणे, गोपाल रगडे, राहुल शेंदरे, राजू गोमासे, नरेंद्र शेंदरे, गुलाब तांडेकर, समीर रामटेके यासह मोठ्या संख्येने सफाई कामगार उपस्थित होते.

“नगरपरिषद लेखा विभागातील कर्मचारी निवडणुकीच्या एसआयआर मध्ये व्यस्त असल्याने सफाई कामगारांच्या वेतन देण्यासाठी विलंब झाला आहे परंतु येत्या सोमवार पर्यंत प्रलंबित वेतन कामगारांच्या खात्यात जमा करण्यात येईल.”
– सचिन बोपचे, उपाध्यक्ष, नगर परिषद तुमसर, जिल्हा भंडारा.

“सफाई कामगारांचे थकीत वेतन येत्या सोमवारपर्यंत खात्यात जमा न झाल्यास आणि वारसा हक्कासह इतर मागण्या पूर्ण न केल्यास, सफाई कामगारांसोबत नगर परिषदेत तीव्र संप पुकारेल आणि यास नगरपरिषद प्रशासनच जबाबदार असेल.”
– अमित मेश्राम, संस्थापक अध्यक्ष, स्वराज्य युवा एकता फाऊंडेशन, तुमसर, जिल्हा भंडारा.

“आम्ही दिवसरात्र शहर स्वच्छ ठेवतो, तरीही रक्षाबंधनाच्या सणात आम्हाला दोन महिन्यांपासून वेतनापासून वंचित राहावे लागत आहे. प्रशासनाने कामाच्या व्यस्ततेची कारणे न सांगता येत्या सोमवारपर्यंत आमचे थकीत वेतन त्वरित जमा करावे, अन्यथा आम्हाला कामबंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.”
– सुरज खांडेकर, सफाई कामगार, नगर परिषद तुमसर.