24.6 C
Gondiā
Saturday, August 22, 2026
Home रोजगार/व्यापार वाल्मीक मत्स्य बीज व मत्स्य खाद्य निर्मिती प्रकल्पामुळे मत्स्यपालनाला नवी दिशा; गोंदियात...

वाल्मीक मत्स्य बीज व मत्स्य खाद्य निर्मिती प्रकल्पामुळे मत्स्यपालनाला नवी दिशा; गोंदियात खरेदी-विक्री संमेलन

0
21

गोंदिया, दि. 22 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा अभियान कक्ष, गोंदिया यांच्या वतीने जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘वाल्मीक मत्स्य बीज व मत्स्य खाद्य निर्मिती प्रकल्प’ (राजीवनगर, ताळगाव, ता. अर्जुनी मोरगाव) संदर्भात विशेष खरेदी-विक्री संमेलन व मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले. प्रकल्प संचालक तथा जिल्हा अभियान सहसंचालक प्रमिला जाखलेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
संमेलनाला जिल्ह्यातील मोठ्या संख्येने मत्स्यपालक, मत्स्य व्यवसायिक तसेच मत्स्य बीज व मत्स्य खाद्य विक्रेते उपस्थित होते. यावेळी प्रमिला जाखलेकर यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती देत, केंद्रात उपलब्ध असलेले उच्च दर्जाचे मत्स्य बीज व मत्स्य खाद्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच आधुनिक मत्स्यपालन, उत्पादनवाढ आणि ग्रामीण भागातील रोजगार व उत्पन्नवाढीसाठी या प्रकल्पाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
बैठकीत मत्स्यपालन क्षेत्रातील विविध संधी, बाजारपेठेची उपलब्धता आणि शाश्वत व्यवसाय विकासाबाबतही उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील मत्स्यपालकांना दर्जेदार साहित्य उपलब्ध होऊन मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.यावेळी मत्स्य विकास अधिकारी भोपेश चिरवटकर, जिल्हा अभियान व्यवस्थापक नरेंद्र राहांगडाले, जिल्हा व्यवस्थापक (उपजीविका) अश्विन घनमारे, सर्व मत्स्य व्यवस्थापक तसेच जिल्ह्यातील मत्स्य खाद्य विक्रेते व मत्स्यपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.