24.6 C
Gondiā
Saturday, August 22, 2026
Home मराठवाडा/खान्देश लातूर पीएम श्री नवोदय विद्यालयातील वैभव कुलकर्णी यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

लातूर पीएम श्री नवोदय विद्यालयातील वैभव कुलकर्णी यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

0
10
शिक्षक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्ली येथे वितरण
लातूर, दि. 22 : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देत शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या देशभरातील 48 शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 साठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये लातूर येथील पीएम श्री नवोदय विद्यालयातील शिक्षक वैभव वसंतराव कुलकर्णी यांचाही समावेष आहे. शिक्षक दिनानिमित्त 5 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत हा पुरस्कार दिला जातो. नावीन्यपूर्ण अध्यापन, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्त्व विकास, शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केलेले प्रयत्न तसेच सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील वैभव वसंतराव कुलकर्णी (लातूर), डॉ. कविता नृसिंहराव गिट्टे (बीड), कुंदा जयवंत बच्छाव (नाशिक) आणि शिवप्रसाद अरविंद टिंगरे (सातारा) यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
लातूर येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय येथे कार्यरत असलेल्या वैभव कुलकर्णी यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, विज्ञान-तंत्रज्ञान आणि कौशल्याधारित शिक्षणावर विशेष भर दिला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी विविध शालेय व राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
तीन टप्प्यांत निवड प्रक्रिया
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी यंदा जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा तीन टप्प्यांत निवड प्रक्रिया राबविण्यात आली. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय पोर्टलवर 15 जून ते 20 जुलै 2026 या कालावधीत पात्र शिक्षकांकडून ऑनलाइन स्व-नामांकन मागविण्यात आले होते. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, नावीन्यपूर्ण अध्यापन, व्यक्तिमत्त्व विकास, शाळेच्या गुणवत्तावाढीसाठीचे प्रयत्न आणि वंचित घटकांसाठी केलेले कार्य या निकषांवर मूल्यमापन करून अंतिम ४८ शिक्षकांची निवड करण्यात आली.
विज्ञान भवनात राष्ट्रीय गौरव
शिक्षक दिनानिमित्त 5 सप्टेंबर रोजी विज्ञान भवनात होणाऱ्या विशेष समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील. पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या प्रेरणादायी कार्याची माहिती देणारे लघुपटही यावेळी प्रदर्शित करण्यात येणार आहेत. या सोहळ्याचे दूरदर्शन, शिक्षण मंत्रालयाची ‘स्वयं प्रभा’वाहिनी तसेच अधिकृत वेबकास्ट आणि सोशल मीडिया माध्यमांवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.