CHO च्या अनुपस्थितीवर कडक कारवाईचे निर्देश;”रुग्णांची हेळसांड झाल्यास जबाबदारी निश्चित” – आमदार अग्रवालांची ताकीद
गोंदिया,दिनांक २२ ऑगस्ट:ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्यात चालढकल करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता आमदार विनोद अग्रवाल यांनी चांगलाच दणका दिला आहे. पंचायत समिती गोंदिया येथे आयोजित ‘एकात्मिक आरोग्य वर्धिनी समिती’च्या तिमाही बैठकीत आमदारांनी आरोग्य यंत्रणेच्या एकूणच सुस्त कारभारावर तीव्र ताशेरे ओढले. “केवळ रजिस्टर भरून कागदोपत्री खानापूर्ती करणे आता खपवून घेतले जाणार नाही, प्रत्यक्ष जमिनीवर काम दिसलेच पाहिजे,” अशा कडक शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.
आमदार विनोद अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) आणि ग्रामीण रुग्णालयांच्या दयनीय अवस्थेचा पाढाच वाचण्यात आला. दौऱ्यादरम्यान नागरिकांनी मांडलेल्या तक्रारींचा हवाला देत आमदारांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
औषधांचा तुटवडा अन् CHO ची दांडी; आमदारांचा पारा चढला!
ग्रामीण भागातील सरकारी दवाखान्यांमध्ये रुग्णांना वेळेवर औषधे न मिळणे आणि उपचारासाठी इकडे-तिकडे भटकावे लागणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे सांगत, औषधांची नियमित उपलब्धता सुनिश्चित करण्याचे आदेश देण्यात आले. जर औषधांअभावी रुग्णांची हेळसांड झाली, तर थेट संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून जबाबदारी निश्चित केली जाईल, असा सज्जड इशारा यावेळी देण्यात आला.त्याचप्रमाणे, गावागावांत कार्यरत असणाऱ्या ‘कम्युनिटी हेल्थ ऑफिसर’ (CHO) च्या अनुपस्थितीबाबत आमदारांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. उपकेंद्रे फक्त कागदावर चालणार नाहीत. CHO ने आपल्या क्षेत्रात प्रत्यक्ष उपस्थित राहून सेवा दिलीच पाहिजे. त्यांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी ग्रामसेवकांमार्फत पत्रे जारी करून घरोघरी जाऊन पाहणी करण्याचे स्पष्ट निर्देश यावेळी देण्यात आले.
बैठकीत जर्जर इमारतींची दुरुस्ती: अत्यंत वाईट स्थितीत असलेल्या उपआरोग्य केंद्रांच्या (Sub Centers) दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्याचे आदेश देण्यात आले.प्रसूतीचे प्रमाण वाढवणे: गर्भवती महिलांना वेळेत उपचार मिळवून देत संस्थात्मक प्रसूतीचे (Institutional Deliveries) उद्दिष्ट वाढवण्यावर भर देण्यात आला.पारदर्शकता आणि माहिती फलक: प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध औषधे, डॉक्टर आणि सुविधांचे रेकॉर्ड फलक नागरिकांना स्पष्ट दिसतील अशा ठिकाणी लावणे बंधनकारक केले आहे.बोगस डॉक्टरांचा ससेमिरा: ग्रामीण भागातील जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि कोणत्याही पदवीशिवाय दुकान मांडून बसलेल्या बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे कठोर निर्देश प्रशासनाला देण्यात आले.
या बैठकीला पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले, BDO श्री लोंढे, निवासी वैद्यकीय अधिकारी श्री जायसवाल, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश जाधव, जिल्हा परिषद सदस्या दीपा चंद्रिकापुरे, वैशाली पंधरे, पूजा अखिलेश सेठ, शैलजा सोनवाने यांच्यासह आरोग्य विभागाचे सर्व वैद्यकीय अधिकारी आणि CHO मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमदार विनोद अग्रवाल यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर आता आरोग्य विभागातील कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून, ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेत प्रत्यक्ष सुधारणा कधी होणार, याकडे गोंदियाकरांचे लक्ष लागले आहे.





