महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते सन्मान
गोंदिया, दि. २२ ऑगस्ट : महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या विद्युत क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स’ (भारत) संस्थेचा ‘एमिनेंट इंजिनियर’ हा राष्ट्रीय पुरस्कार अमरावती येथे शुक्रवारी (दि. २१) राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.
‘आयईआय’च्या ४१ व्या राष्ट्रीय विद्युत अभियंता अधिवेशनाचे अमरावती येथे शुक्रवारी (दि.२१) उद्घाटन झाले. या अधिवेशनात ‘विकसित भारताचे ध्येय: एआय आणि हरित तंत्रज्ञानाद्वारे ऊर्जा क्षेत्राचा कायापालट’ या विषयावर विचारमंथन झाले. सायंकाळच्या सत्रात ‘आयईआय’च्या वतीने जाहीर झालेला ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांना महसूलमंत्री चंद्रशेखऱ बावनकुळे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार प्रवीण पोटे, आमदार प्रवीण तायडे, ‘द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स’चे (भारत) अध्यक्ष मनिष कोठारी, पदाधिकारी आनंद जवंजाळ, राम विघे, आर. आर. तंवर, सुनील राठी आदींची उपस्थिती होती.
देशातील सर्वात मोठी व्यावसायिक संस्था असलेल्या ‘द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स इंडिया’ची स्थापना १९२० मध्ये झाली आहे. कोलकाता मुख्यालय असलेल्या या संस्थेचे देशभरात १२५ पेक्षा अधिक स्थानिक केंद्र आहेत. विद्युत क्षेत्रामधील ३७ वर्षांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल राजेंद्र पवार यांचा या संस्थेकडून ‘एमिनेंट इंजिनियर’ राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आला.





