माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांचे आश्वासन; आंदोलकांचा दावा, काम पूर्ण होईपर्यंत लढा राहणार सुरू
गोंदिया-गोंदिया शहरातील सिग्नल टोली, कुंभारे नगर आणि लक्ष्मीनगर या तीन महत्त्वाच्या प्रभागांतील नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नागरी हक्क व सुरक्षा समितीच्या नेतृत्वात सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन अखेर यशोशिखराकडे वाटचाल करत आहे. गेल्या ४४ दिवसांपासून सलग सुरू असलेल्या या आंदोलनाची दखल घेत रेल्वे ओव्हर ब्रिजच्या (आरओबी) निर्मितीची प्रक्रिया रेल्वे प्रशासनाकडून वेगाने सुरू करण्यात आल्याची सकारात्मक माहिती समोर आली आहे.
या परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी सोयीस्कर आरओबी उभारावा, अशी आग्रही मागणी घेऊन स्थानिक शिष्टमंडळाने राज्यसभा खासदार व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांची भेट घेतली. राज्यसभा खासदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रफुल पटेल यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. याप्रसंगी झालेल्या सकारात्मक चर्चेदरम्यान, “सदर आरओबीच्या बांधकामाची प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया अत्यंत वेगाने सुरू असून या लोकहिताच्या मागणीकडे स्वतः जातीने लक्ष देत रेल्वे प्रशासनाशी सातत्याने संपर्क साधत आहे,” असे आश्वासन प्रफुल पटेल यांनी दिले. लोकप्रतिनिधींच्या या पुढाकारामुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न निकाली निघण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
४४ दिवसांचा संघर्ष अन् जन पाठिंबा
-
आंदोलनाचा निर्धार: सलग ४४ दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला स्थानिक जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. जोपर्यंत प्रत्यक्ष पुलाच्या बांधकामास सुरुवात होऊन काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा ठाम निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
-
आंदोलनाचे नेतृत्व: सुरेश रंगारी व राजेश बंसोड यांच्या संचालनाखाली एच.जी. रंगारी, दीपक बनसोड, नामदेव मेश्राम, जी.एस. लोनारे, डी.एस. मेश्राम, दिनेश गेडाम, किशोर मेश्राम, रूपदास मेश्राम, विजयकुमार कांबळे, वामन मेश्राम, दिलीप वासनिक, जितेंद्र सतीसेवक, सुरेंद्र महाजन, संजय मेश्राम, विनोद वासनिक, विजय रंगारी, राजकुमार हुमने, किशोर गजभिये, आनंद शहारे, ए.बी. मेश्राम, अनिल रंगारी, सुनील चव्हाण, तसेच समितीचे अध्यक्ष अमितकुमार मेश्राम, सतीश बनसोड व जयंत कुंभलवार यांसारखे शेकडो नागरिक या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवत आहेत.लोकप्रतिनिधींनी दिलेले आश्वासन आणि रेल्वे प्रशासनाकडून सुरू झालेल्या हालचालींमुळे गोंदियातील तीनही प्रभागांतील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, प्रत्यक्ष पुलाचे काम कधी सुरू होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




