25.1 C
Gondiā
Monday, August 24, 2026
Home विदर्भ खामखुरा येथे पडक्या घराची भिंत कोसळून दोन वर्षांच्या बालिकेचा दुर्दैवी अंत

खामखुरा येथे पडक्या घराची भिंत कोसळून दोन वर्षांच्या बालिकेचा दुर्दैवी अंत

0
6

अंगणात खेळताना काळाचा घाला; कोरंभी व खामखुरा गावांवर शोककळा

गोंदिया,दि.२४-सततच्या पावसामुळे ओलसर झालेल्या पडक्या घराची भिंत अचानक कोसळल्याने एका दोन वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा येथे आज दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास घडली. प्रतिक्षा मुकेश राऊत (वय २ वर्षे, रा. कोरंभी) असे मृत बालिकेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिक्षाचे आई-वडील शेतमजुरीचे काम करतात. तिचे वडील तिला रोज सकाळी खामखुरा येथील नातेवाईक केशव नेवारे यांच्या घरी आणून सोडायचे आणि सायंकाळी घरी घेऊन जायचे. सोमवारी दुपारी प्रतिक्षा अंगणात खेळत असताना शेजारीच असलेल्या विलास नेवारे यांच्या पडक्या घराची भिंत पावसाने ओली झाल्यामुळे अचानक तिच्यावर कोसळली. मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला.

टनेची माहिती मिळताच खामखुरा येथील पोलीस पाटील जयप्रकाश लाडे यांनी बीट अंमलदार सुभाष डोंगरवार यांना फोनवरून माहिती दिली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, अर्जुनी मोरगाव येथे पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे कोरंभी आणि खामखुरा या दोन्ही गावांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, पीडित कुटुंबाला शासनाने तातडीने सानुग्रह मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास बीट अंमलदार सुभाष डोंगरवार व सहकारी तुलवी करत आहेत.