बुलढाणा,दि.२५ः- डिजिटल युगात स्क्रीन टाईममुळे हरवत चाललेले बालपण आणि लहान मुलांच्या ढासळत्या आरोग्याची दखल घेत, जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा, कदमापूरच्या शाळा व्यवस्थापन समितीने एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. ‘मोबाईलमुक्त विद्यार्थी’ या संकल्पनेअंतर्गत शाळेने विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम पूर्णपणे बंद करण्याचा ठराव मंजूर करत संपूर्ण राज्यासमोर एक नवा वस्तूपाठ घालून दिला आहे.
चिंताजनक पार्श्वभूमी
आजकाल पालकांचा मुलांशी होणारा संवाद थंडावला असून, चिमुकल्यांचा स्क्रीन टाईम भयावह रितीने वाढत आहे. या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांमध्ये डोळ्यांचे विकार वाढीस लागले असून, त्यांची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमता खालावत चालली आहे. मुले हट्टी बनत असून पालकांच्या नियंत्रणाबाहेर जात आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांची वाचन क्षमता ढासळून त्यांचे सुंदर बालपण या डिजिटल पडद्याआड हरवत चालल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
अशी होणार प्रभावी अंमलबजावणी
केवळ ठराव न करता, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी कदमापूर शाळेने विशेष नियोजन केले आहे:
-
तंत्रज्ञानाचा समतोल वापर: विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये ‘डिजिटल वेलबिइंग ॲण्ड पॅरेंटल कंट्रोल्स’ हे ॲप इंस्टॉल केले जाईल, ज्याद्वारे मुलांच्या मोबाईल वापराची अचूक माहिती पालकांना मिळेल.
-
विशेष सत्कार व बक्षीस: ज्या विद्यार्थ्यांनी महिनाभरात मोबाईलवर एकही गेम खेळला नाही किंवा स्क्रीन टाईम टाळला, अशा विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा शाळा व्यवस्थापन समितीमार्फत जाहीर सत्कार केला जाणार आहे.
“आज आपण विद्यार्थ्यांना मोबाईलच्या तावडीतून सोडवले नाही, तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. गावात दर्जेदार शैक्षणिक वातावरण तयार करण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे,” अशी भूमिका शाळा व्यवस्थापन समितीने व्यक्त केली.
शाळा आणि पालकांनी एकत्र येत घेतलेला हा निर्णय निश्चितच कौतुकास्पद असून, यामुळे चिमुकल्यांच्या हातात मोबाईलऐवजी पुन्हा पुस्तके आणि खेळाचे साहित्य दिसेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.





