हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञान, कृषीपूरक व्यवसायातून उत्पन्नवाढीच्या संधींची माहिती
वाशिम ,दि.२५ ऑगस्ट -नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत निवड झालेल्या नागठाणा गावात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला आणि कृषी विज्ञान केंद्र, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आदर्श गाव’ उपक्रमांतर्गत शेतकरी व महिला बचत गटांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमात प्रकल्प विशेषज्ञ – मनुष्यबळ विकास प्रदीप पवार यांनी प्रास्ताविकातून प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, वैयक्तिक लाभाचे घटक, कृषी योजना तसेच हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत व उत्पादनक्षम शेतीसाठी उपलब्ध तंत्रज्ञानाचा प्रभावी अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रकल्प विशेषज्ञ – कृषी व्यवसाय सोहम बेलोकर यांनी महिला बचत गटांना कृषी औजार बँक, सामूहिक साधनसामग्रीचा वापर, कृषीपूरक व्यवसाय आणि एकात्मिक शेती पद्धतीच्या माध्यमातून उत्पन्नवाढीच्या संधींबाबत मार्गदर्शन केले.यावेळी शेतकरी व महिला बचत गटांच्या सदस्यांनी विविध योजना, कृषी व्यवसाय आणि हवामान अनुकूल तंत्रज्ञानाबाबत प्रश्न विचारले. उपस्थितांच्या प्रश्नांचे निरसन करून योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी समजावून सांगण्यात आल्या.
बदलत्या हवामान परिस्थितीत शेती अधिक शाश्वत व उत्पादनक्षम करण्यासोबतच कृषीपूरक व्यवसायांना चालना देणे, सामूहिक साधनसामग्रीचा प्रभावी वापर करणे आणि उपलब्ध शासकीय योजनांचा लाभ घेणे याबाबत कार्यक्रमातून मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी समूह सहाय्यक संजना अवस्थी यांनी आभार मानले. शेतकरी, महिला बचत गट आणि प्रकल्पातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागातून नागठाणा गावाचा शाश्वत, हवामान अनुकूल आणि सर्वसमावेशक कृषी विकास साधण्यास ‘आदर्श गाव’ उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.





