26.4 C
Gondiā
Tuesday, August 25, 2026
Home Featured News वडिलांसाठी लेक बनली जीवनदायिनी !

वडिलांसाठी लेक बनली जीवनदायिनी !

0
6
यशोगाथा 

यकृताचा अंश दान करून निकीता नांदगावकर यांनी वडिलांना दिले नवजीवन
अवयवदानाचा समाजासमोर ठेवला प्रेरणादायी आदर्श
वाशिम : ज्या हाताने बापाचे बोट धरून लेक चालायला शिकली, त्याच बापाच्या आयुष्याची वाट खडतर झाली तेव्हा हीच लेक त्यांच्यासाठी जीवनदायिनी ठरली. गंभीर आजारामुळे वडिलांचे यकृत निकामी होण्याच्या मार्गावर असताना निकीता संजीवकुमार नांदगावकर यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतःच्या यकृताचा एक भाग वडिलांना दान करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि वडिलांना नवजीवन मिळाले. वडील-लेकीच्या नात्यातील प्रेम, त्याग आणि धैर्याची ही कहाणी आता अवयवदानाबाबत समाजाला प्रेरणा देणारी यशोगाथा ठरली आहे.
संकटाच्या क्षणी लेकीने घेतला धाडसी निर्णय
संजीवकुमार नांदगावकर यांना गंभीर आजाराने गाठले होते. यकृताची कार्यक्षमता खालावत गेल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या संकटामुळे संपूर्ण कुटुंबावर चिंतेचे सावट होते. उपचारांसाठी यकृत प्रत्यारोपणाची गरज असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कुटुंबासमोर मोठे आव्हान उभे राहिले.
या कठीण परिस्थितीत निकीता यांनी स्वतःच्या यकृताचा एक भाग वडिलांना दान करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय केवळ भावनिक नव्हता, तर त्यासाठी मोठे धैर्य आणि मानसिक तयारी आवश्यक होती. शस्त्रक्रियेची भीती, स्वतःच्या आरोग्याची चिंता या सगळ्यांवर मात करत त्यांनी वडिलांचे जीवन वाचविण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले.
शस्त्रक्रियेच्या क्षणी कुटुंबाची धाकधूक
शस्त्रक्रियेचा दिवस संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत भावनिक होता. पत्नीच्या डोळ्यांत अश्रू, लेक आणि सुनेच्या मनात चिंता, तर वृद्ध आईच्या मनात अस्वस्थता होती. सर्वांच्या मनात एकच प्रार्थना होती—दोघांचीही शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी आणि वडिलांना पुन्हा निरोगी आयुष्य लाभावे.
या कठीण काळात मुलानेही अत्यंत धैर्याने पुढाकार घेतला. वैद्यकीय उपचारांशी संबंधित बाबी तसेच धास्तावलेल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याने समर्थपणे सांभाळली. त्यामुळे कुटुंबाला या संकटाचा सामना करण्याचे बळ मिळाले.
यशस्वी शस्त्रक्रियेनंतर घरात पुन्हा आनंद
अखेर प्रतीक्षेचा क्षण संपला. यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. निकीताने दान केलेल्या यकृताच्या भागामुळे वडिलांना नवजीवन मिळाले. काही दिवसांपूर्वी गंभीर आजाराशी झुंज देणारे वडील पुन्हा कुटुंबीयांसोबत हसताना दिसू लागले.
घरातील वातावरणच बदलून गेले. चिंतेची जागा समाधानाने घेतली. आईच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलले. पत्नीला तिचा जीवनसाथी पुन्हा मिळाला. सुनेला घरातील आधारस्तंभ परत मिळाल्याचा दिलासा मिळाला. नातवाच्या आयुष्यात पुन्हा प्रेमळ आजोबांचे अस्तित्व आले. एका लेकीच्या धाडसी निर्णयामुळे संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यात पुन्हा आनंद फुलला.
‘लेक’ या नात्याचा अर्थ कृतीतून दाखवून दिला
मुलगी म्हणजे केवळ माहेरातून सासरी गेलेले नाते नाही, तर गरजेच्या वेळी आपल्या माणसांसाठी सर्वस्व पणाला लावणारी शक्ती आहे, हे निकीताने कृतीतून दाखवून दिले. वडिलांनी आयुष्यभर तिच्यासाठी केलेल्या त्यागाची परतफेड तिने आपल्या परीने केली.
स्वतःच्या शरीरातील यकृताचा एक भाग वडिलांना दान करून त्यांना जीवनदान देणे ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नव्हती; त्यामागे होते निस्सीम प्रेम, कुटुंबाप्रती असलेली जबाबदारी आणि संकटावर मात करण्याचे अदम्य धैर्य.
अवयवदानाचा समाजाला मोलाचा संदेश
निकीता नांदगावकर यांच्या या निर्णयामुळे एका कुटुंबात आनंद परतला असला, तरी त्यातून समाजासाठीही महत्त्वाचा संदेश पुढे आला आहे. अवयवदानाबाबत जनजागृती होणे आणि त्यासंदर्भातील गैरसमज दूर होणे आवश्यक आहे. योग्य वैद्यकीय मार्गदर्शन आणि निर्धारित प्रक्रियेतून केलेले अवयवदान एखाद्या गरजू व्यक्तीसाठी जीवनाची नवी आशा ठरू शकते.
निकीता यांनी आपल्या कृतीतून अवयवदानाचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. त्यांच्या या धैर्यामुळे एका वडिलांना नवजीवन मिळाले आणि संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यात पुन्हा आशा, आनंद आणि हसू परतले.
आप्तस्वकीयांच्या शुभेच्छा आणि प्रार्थनाही ठरल्या बळ देणाऱ्या
या अवघड प्रसंगी आप्तस्वकीय, मित्रमंडळी आणि हितचिंतकांनी दिलेल्या शुभेच्छा, सदिच्छा तसेच ईश्वरचरणी केलेल्या प्रार्थनाही कुटुंबासाठी मोठा आधार ठरल्या. शस्त्रक्रिया यशस्वी होऊन वडिलांना नवजीवन मिळाल्यानंतर कुटुंबाने या कठीण काळात साथ, धीर आणि प्रार्थनेच्या माध्यमातून बळ देणाऱ्या सर्वांप्रती नांदगावकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
वडिलांसाठी स्वतःच्या शरीराचा एक भाग देणारी ही लेक केवळ आपल्या कुटुंबाची नव्हे, तर समाजाच्या स्मरणात राहणाऱ्या माणुसकीची यशोगाथा ठरली आहे. निकीता नांदगावकर यांच्या धैर्याला आणि त्यागाला मनःपूर्वक सलाम !
-संकलन –अनिल कुरकुटे ,जिल्हा माहिती कार्यालय ,वाशिम