जिल्ह्याच्या ४४ व्या स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून गडचिरोलीवासीयांना शुभेच्छा
उद्योगासोबत जल, जमीन, जंगल व पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य
गडचिरोली, दि. २६ : गडचिरोली जिल्हा निर्मितीला आज, २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा देत गडचिरोलीच्या विकासाच्या वाटचालीचा गौरव केला आहे. माओवादाची जुनी ओळख पुसून गडचिरोली आता देशाचे ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येत असल्याचे त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
गडचिरोली जिल्ह्याचे आपल्या हृदयात कायम वेगळे स्थान असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कायम कटिबद्ध असल्याचे सांगितले. आज हा जिल्हा माओवादमुक्त असल्याचे सांगताना आनंद होत असून, पूर्वीची ओळख पुसून गडचिरोली आता देशाचे ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, २०१४ पासून गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी अतिशय प्रामाणिक प्रयत्न करण्यात आले असून त्याचे परिणाम आज दिसून येत आहेत. जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक येत आहे. उद्योग, शिक्षण, रोजगार आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. त्यामुळे केवळ गडचिरोलीतीलच नव्हे, तर लगतच्या परिसरातील युवकांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
जिल्ह्याच्या औद्योगिक आणि पायाभूत विकासाला चालना देतानाच जल, जमीन, जंगल आणि पर्यावरण यांच्या संवर्धनाचाही तेवढ्याच गांभीर्याने विचार केला जात असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखत गडचिरोलीची प्रगती साधण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी नमूद केले.
मेडिकल कॉलेज, विमानतळ, रेल्वेमार्ग, रस्त्यांची कामे आणि शैक्षणिक सुविधांच्या विस्तारामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला नवी गती मिळत असून जिल्हा वेगाने प्रगती करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गडचिरोलीच्या या परिवर्तनाचे श्रेय जिल्ह्यातील नागरिकांना देत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विकासाच्या प्रक्रियेत नागरिकांनी दिलेल्या भक्कम साथीचेच हे फलित असल्याचे म्हटले आहे. नागरिकांच्या सहभागामुळे जिल्ह्याची विकासाची वाटचाल अधिक गतिमान होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
आपण सर्वांनी मिळून गडचिरोलीच्या विकासात आणखी नवी भर घालूया आणि या प्रयत्नात नागरिकांचे सहकार्य यापुढेही कायम राहू द्यावे, असे आवाहन करत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी गडचिरोली जिल्हा स्थापना दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.





