**चपराळा प्रशांत धाम देवस्थान परिसरातील विकासकामांचाही घेतला आढावा
गडचिरोली, दि. २६ :अहेरी तालुक्यातील खमंचेरू येथील शासकीय आश्रमशाळेला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज अचानक भेट देऊन विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या मूलभूत सुविधा व सुरक्षिततेशी संबंधित उपाययोजनांची सविस्तर पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि निदर्शनास आलेल्या त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी आश्रमशाळेतील वसतिगृह, वर्गखोल्या, स्वयंपाकगृह तसेच परिसराची पाहणी केली. विद्यार्थ्यांसाठी पुरेशा खाटा उपलब्ध आहेत का, खिडक्यांना डास, किटक व इतर जीवांपासून संरक्षणासाठी जाळ्या बसविण्यात आल्या आहेत का, तसेच स्वच्छता व सुरक्षिततेची आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे का, याची त्यांनी बारकाईने तपासणी केली.
*विद्यार्थ्यांकडून अडचणी जाणून घेतल्या*
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर कुलर, अतिरिक्त खाटा तसेच बसण्यासाठी आवश्यक बेंचेसची आवश्यकता असल्याचे विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व बाबींची तत्काळ नोंद घेऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.
*तातडीने कार्यवाहीचे निर्देश*
आश्रमशाळेच्या सुंदर इमारतीचे त्यांनी कौतुक केले. मात्र यासोबतच वसतिगृह आणि इतर नागरी सुविधांशी संबंधित दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हाती घ्यावीत, तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
*चपराळा येथील प्रशांत धाम देवस्थानाची पाहणी*
आश्रमशाळेच्या पाहणीनंतर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी चामुर्शी तालुक्यातील चपराळा येथील हनुमान मंदिर व प्रशांत धाम देवस्थानाला भेट दिली. मंदिर परिसरातील सुरू असलेल्या व प्रस्तावित विकासकामांचा आढावा घेऊन भाविकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा, परिसर विकास आणि सुशोभीकरणाची कामे दर्जेदार व नियोजनबद्ध पद्धतीने तसेच वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.





