25.9 C
Gondiā
Wednesday, August 26, 2026
Home विदर्भ मॉडिफाइड बुलेट सायलेंसरवर तातडीने कारवाई करा : अमर राहुल

मॉडिफाइड बुलेट सायलेंसरवर तातडीने कारवाई करा : अमर राहुल

0
8

कर्णकर्कश आवाजामुळे नागरिक त्रस्त; कारवाईची गरज
गोंदिया : शहरातील वाढत्या ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर आणि दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत असून, विशेषतः मॉडिफाइड सायलेंसर असलेल्या बुलेट व इतर दुचाकी वाहनांमुळे होणारा कर्णकर्कश आवाज नागरिकांसाठी मोठा मनस्ताप ठरत आहे. याविरोधात सामाजिक कार्यकर्ते अमर राहुल यांनी प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.
काही वाहनचालक आपल्या वाहनांमधील कंपनीचे मूळ सायलेंसर बदलून मोठ्या आवाजाचे मॉडिफाइड सायलेंसर वापरतात. रस्त्यावरून जाताना अचानक होणारे फटाक्यांसारखे आवाज किंवा विनाकारण रेसिंगमुळे वृद्ध, लहान मुले, विद्यार्थी, रुग्ण आणि रात्रपाळी करून विश्रांती घेणार्‍या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सततच्या ध्वनी प्रदूषणामुळे चिडचिड, तणाव, निद्रानाश, एकाग्रतेत घट आणि श्रवणशक्तीवर परिणाम यांसारख्या गंभीर समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे हा प्रश्न केवळ वाहतुकीचा न राहता नागरिकांच्या आरोग्याशी जोडला गेला आहे.
शहरातील प्रमुख चौक, शाळा, रुग्णालये आणि निवासी परिसरात रात्रीच्या वेळी पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम राबवावी. नयमबाह्य मॉडिफाइड सायलेंसर तातडीने जप्त करून मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात यावी. वाहतूक पोलिस व स्थानिक प्रशासनाने ध्वनी प्रदूषणाविरुद्ध विशेष मोहीम राबवून नागरिकांमध्ये जनजागृती करावी. प्रशासनाने या समस्येची दखल घेऊन ध्वनी प्रदूषण करणार्‍या वाहनांवर सातत्यपूर्ण व कडक कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता अमर राहुल यांनी केली आहे.