; आमदार विनोद अग्रवालांच्या ‘सुशोभीकरणा’ची जुमलेबाजी उघडी?
पोस्टरवर चकचकीत ‘स्मार्ट बस स्टॉप’, प्रत्यक्षात मात्र प्रवाशांच्या नशिबी चिखल, खड्डे आणि दुर्गंधी! एक वर्ष उलटले तरी काम ठप्प; गोंदियाकरांचा संतप्त सवाल: “घोषणांचा पाऊस पाडणारे आमदार महोदय, काम कधी सुरू होणार?”
गोंदिया,दिनांक 27 ऑगस्ट:“अब बदलेगा गोंदिया का चेहरा!” आणि “यह बस स्टॉप नहीं, हमारा शहर बदलने की शुरुआत है!” अशा गोंडस अन् आकर्षक ओळी लिहून सोशल मीडियावर मोठमोठे पोस्टर्स झळकावणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या घोषणा हवेतच विरल्याचे विदारक चित्र आज गोंदिया शहरात पाहायला मिळत आहे. गोंदियातील अतिशय महत्त्वाच्या आणि मध्यवर्ती जयस्तंभ चौकातील बसस्थानकाचे १ कोटी ७० लाख रुपयांच्या निधीतून अत्याधुनिक सुशोभीकरण करण्याची भंपक घोषणा करून तब्बल एक वर्षाचा कालावधी लोटला, मात्र आजही हे बसस्थानक आपल्या दयनीय अवस्थेवर अश्रू ढाळत उभे आहे.
आमदार विनोद अग्रवाल यांनी वर्षभरापूर्वी मोठ्या दिमाखात प्रचार-प्रसिद्धीचा नारळ फोडत जयस्तंभ चौक बसस्थानकाच्या नूतनीकरणाची घोषणा केली होती. आधुनिक वास्तुशिल्पीय डिझाइन, स्वच्छ व सुंदर प्रतीक्षालय, अत्याधुनिक महिला/पुरुष व दिव्यांगांसाठी शौचालये, शुद्ध पेयजल, डिजिटल सूचना बोर्ड, सीसीटीव्ही सुरक्षा यंत्रणा आणि हरित सौंदर्यीकरणाची रंगीत स्वप्ने गोंदियाच्या जनतेला दाखवण्यात आली होती. पोस्टरवर थ्रीडी डिझाईनचे चित्ताकर्षक फोटो छापून स्वतःचा ‘उदो उदो’ करून घेण्यात लोकप्रतिनिधी आणि त्यांचे कार्यकर्ते कमालीचे यशस्वी ठरले. परंतु, या बातमीला वर्ष उलटूनही प्रत्यक्ष जागेवर एक विटासुद्धा रचली गेलेली नाही.
प्रचाराचा स्टंट की जनतेची दिशाभूल?
ज्या बस स्थानकावरून दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी आणि महिला प्रवास करतात, तिथे आज स्वच्छतेचा आणि मूलभूत सुविधांचा पुरता बोजवारा उडालेला आहे. पावसाळ्यात उघड्यावर उभे राहावे लागणे, दुर्गंधीयुक्त परिसर आणि खड्ड्यांचे साम्राज्य यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. १.७० कोटी रुपयांचा निधी नेमका कुठे गेला? की ही केवळ निवडणुकीच्या तोंडावर केलेली जुमलेबाजी होती? असा आक्रमक सवाल आता गोंदियातील जनता विचारत आहे.
नागरिकांमधून संतापाची लाट: “आमच्या तोंडाला पाने पुसणे बंद करा!”
वर्षभरात या प्रकल्पाबाबत लोकप्रतिनिधींनी एक शब्दही न उच्चारल्यामुळे नागरिकांमधील असंतोष शिगेला पोहोचला आहे. “आम्हाला कागदी नकाशे आणि सोशल मीडियावरील डिझाईन्स नकोत, प्रत्यक्ष काम दाखवा!” असा थेट इशारा आता गोंदियातील संतप्त जनता देत आहे. जाहिरातबाजीतून स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या लोकप्रतिनिधींना आता या उघड्या पडलेल्या आश्वासनांवर उत्तर देणे कठीण होऊन बसले आहे.
आता तरी संबंधित लोकप्रतिनिधी आणि प्रशासन निद्रिस्त अवस्थेतून जागे होऊन या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करणार, की गोंदियाकरांना अजूनही अशाच पोकळ घोषणांचा मारा सहन करावा लागणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




