24.6 C
Gondiā
Thursday, August 27, 2026
Home विदर्भ कोरणी घाट तीर्थस्थळासाठी सर्व्हिस रोडला एनएचएआयची मिळाली मंजुरी

कोरणी घाट तीर्थस्थळासाठी सर्व्हिस रोडला एनएचएआयची मिळाली मंजुरी

0
9

गोंदिया : कोरणी घाटातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर तीर्थस्थळावर येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी राष्ट्रीय महामार्गावरून नव्या अप्रोच रोड (सर्व्हिस रोड) निर्माणासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआयने) मंजुरी दिली आहे. ६ ऑगस्ट २०२६ रोजी हा प्रस्ताव सक्षम प्राधिकाऱ्यांनी स्वीकारला. सर्व आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काम सुरू करण्यात येणार आहे. यामुळे भाविकांची गैरसोय टाळण्यास मदत होणार आहे.
दरवर्षी कोरणीघाट येथे धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह गणेशोत्सव आणि नवरात्री दरम्यान येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते. सध्याच्या अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीस अडसर ठरत होता. स्थानिक नागरिक, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ट्रस्ट आणि विविध मंडळांनी नव्या मार्गाची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केतन तुरकर यांच्या माध्यमातून खा. प्रफुल्ल पटेल व राजेंद्र जैन यांच्याकडे केली होती. याची त्यांनी गांभीर्याने दखल घेत एनएचएआय अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार व प्रत्यक्ष संवाद साधून ही समस्या मार्गी लावण्यास सांगितले. यानंतर एनएचएआय प्रकल्प विभागाने कोरणीघाट येथील सर्व्हिस रोडला मंजुरी दिली आहे. नव्या मार्गामुळे कोरणी घाटातील प्रवासामध्ये भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच धार्मिक-सांस्कृतिक आयोजनास सोयीचे होणार असल्याने भाविक व नागरिकांनी खा. प्रफुल्ल पटेल, राजेंद्र जैन यांचे आभार मानले आहे.

कोरणी घाटातील वाहतूक समस्या मार्गी लावण्यासाठी सव्हींस रोडची अत्यंत गरज होती. अखेर खा. प्रफुल्ल पटेल, राजेंद्र जैन यांच्या पाठपुराव्यानंतर एनएचएआयने याला मंजुरी दिल्याने भाविकांची मोठी अडचण दूर झाली आहे.
– केतन तुरकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस