; आरोपीला कठोर शिक्षेसाठी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवणार
पुणे,दि.२७: जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार व निर्घृण हत्या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. हे कृत्य अत्यंत वेदनादायी असून, या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
घटनेच्या तपासासंदर्भात उप मुख्यमंत्र्यांनी पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. तपासात कोणतीही त्रुटी राहू नये, आरोपीविरोधात लवकरात लवकर आणि ठोस आरोपपत्र दाखल करावे, असे कडक निर्देश त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले. हा खटला जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) चालवून आरोपीला लवकरात लवकर कडक शिक्षा मिळवून दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पीडित कुटुंबाला आर्थिक मदत व तातडीची उपाययोजना:
-
आर्थिक साहाय्य: पीडित कुटुंबाला ‘मनोधैर्य योजने’तून १० लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली असून ही रक्कम तात्काळ खात्यावर जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय ‘राष्ट्रवादी वेल्फेअर फंडा’मार्फत ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
-
पुनर्वसन व घरकुल: पीडित कुटुंबाच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना ‘शबरी घरकुल योजने’तून तातडीने घर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
-
सुरक्षेसाठी उपाय: गावात महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी मोक्याच्या ठिकाणी तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे आणि हायमास्क दिवे बसवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
-
विशेष शिबिर: परिसरातील नागरिकांना जातीचे दाखले उपलब्ध करून देण्यासाठी विशेष शिबिर आयोजित केले जाईल.
यावेळी आमदार शरद सोनवणे, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, उप पोलीस अधीक्षक धनंजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य छाया तांबे, कल्पना काळे, सोनाबाई दाभाडे, अमित बेनके, विकास दरेकर, देवराम लांडे, पूजा बुट्टे, सुप्रिया लेंडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





