27.5 C
Gondiā
Thursday, August 27, 2026
Home महाराष्ट्र VB-GRAMG योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियोजन, रोजगार आणि E-KYC वर भर द्या: रोहयो...

VB-GRAMG योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियोजन, रोजगार आणि E-KYC वर भर द्या: रोहयो मंत्री भरत गोगावले

0
15

मुंबई,दि.२७:विकसित भारत – रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) (VB-GRAMG) या योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक पार पडली. योजनेच्या यशस्वीतेसाठी सर्व संबंधित यंत्रणांनी नियोजनबद्ध काम करत मजुरांना मागणीनुसार वेळेत रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि E-KYC च्या प्रक्रियेवर विशेष भर द्यावा, असे निर्देश मंत्री महोदयांनी दिले.

आढावा बैठकीत राज्यातील सर्वाधिक कामे सुरू असलेल्या ११ जिल्ह्यांच्या प्रगतीचा आलेख मांडण्यात आला. यात नंदुरबार, अहिल्यानगर, यवतमाळ, नाशिक आणि चंद्रपूर या जिल्ह्यांनी केलेल्या कामगिरीचे मंत्री गोगावले यांनी विशेष कौतुक केले. या जिल्ह्यांची कार्यपद्धती आदर्श मानून इतर जिल्ह्यांनीही त्याच धर्तीवर कामांचे नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीतील महत्त्वाचे निर्देश व निर्णय:

  • पंचवार्षिक आराखडा: ग्रामपंचायत स्तरावर सर्वांगीण विकासासाठी ‘विकसित ग्रामपंचायत प्लॅन’ हा पंचवार्षिक आराखडा तयार करावा.

  • कामांचा शेल्फ (Shelf of Works): मजुरांना मागणीनुसार तातडीने काम उपलब्ध व्हावे, यासाठी पुरेसा कामांचा शेल्फ तयार ठेवण्याच्या सूचना.

  • E-KYC पूर्ण करणे: योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि मजुरांचा हक्क अबाधित राखण्यासाठी सर्व मजुरांचे E-KYC प्राधान्याने पूर्ण करावे.

  • समन्वयाने काम: नियोजनबद्ध ग्रामविकास आणि रोजगाराची हमी देण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून काम करण्याचे आवाहन.

या व्हीडिओ कॉन्फरन्सला रोहयो विभागाचे सचिव आप्पासाहेब धुळाज (भा.प्र.से.), आयुक्त अनिता मेश्राम (भा.प्र.से.), सहसचिव अतुल कोदे, कैलास साळुंके, सहआयुक्त डॉ. विवेक घोडके यांच्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि रोहयो विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.