पालकमंत्री संजय राठोड अन् खासदारांनी तातडीने लक्ष देऊन दोन दिवसांत रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी
दिग्रस (प्रतिनिधी):जातद्वेषातून शेताचा रस्ता अडवून एका दलित शेतकऱ्याची तब्बल ४ एकर जमीन पेरू न दिल्याची संतापजनक व गंभीर घटना दिग्रस तालुक्यातील सावंगा बु. लगतच्या लिंबा येथे समोर आली आहे. “महाराचा पाय माझ्या जमिनीला लागता कामा नये,” असे जातीयवादी उद्गार काढत गेटला कुलूप ठोकून शेतरस्ता बंद करण्यात आल्याचा आरोप बाधित शेतकरी सुखदेव पांडुरंग लोखंडे यांनी केला आहे.
याप्रकरणी शेतकरी चळवळीचे प्रा. पंढरी पाठे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देऊन तसेच दिग्रसचे तहसीलदार मयूर राऊत यांच्याशी संपर्क साधून रस्ता मोकळा करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हा प्रश्न चिघळल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान भावूक झालेल्या सुखदेवराव यांनी आपल्या पाठीशी अनाथ नातवंडे असून खरीप हंगाम वाया गेल्याने आता पोटापाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याची व्यथा मांडली.
मुख्य मागण्या व पाहणीतील महत्त्वाचे मुद्दे:
-
दोन दिवसांत रस्त्याची मागणी: पालकमंत्री संजय राठोड, खासदार संजय देशमुख आणि तहसीलदार मयूर राऊत यांनी तातडीने हस्तक्षेप करून दोन दिवसांत हक्काचा रस्ता मोकळा करून द्यावा.
-
नुकसानभरपाईची मागणी: पेरणी न झाल्याने झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई आणि रब्बी हंगामासाठी शेती संसाधने उपलब्ध करून देण्यात यावीत.
-
ग्रामस्थांचा तीव्र आक्रोश: पाहणीवेळी ५० हून अधिक गावकऱ्यांनी प्रशासकीय दुर्लक्षाबद्दल तीव्र असंतोष व्यक्त केला.
या पाहणीवेळी शेतकरी चळवळीचे कृष्णा पुसनाके, सचिन मनवर यांच्यासह मारुती शिंदे, महादेव भुजाडे, अनिकेत शिंदे, उमेश शिरसाट, विलास बावणे, सुदीप जाधव, अरविंद जाधव, योगेश साखरे, ज्ञानेश्वर वाघमारे, सुनील जाधव, अमर शिंदे, अतुल शिरसाट, बंटी शिरसाट, वसंता शिंदे, हर्षल लडके, गोलू जाधव, आकाश साखरे यांच्यासह परिसरातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





