अप्पर सचिवांसह ६ जणांना अटक; मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई
मुंबई (प्रतिनिधी):राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापकाने आपल्या मुलीला अधिकारी बनवण्यासाठी चक्क MPSC चा पेपर फोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाच्या तपासात प्रेम, ब्रेकअप, सूड आणि १२ लाख रुपयांच्या सौद्याची थरारक कहाणी समोर आली आहे. मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणी MPSC च्या अप्पर सचिवांसह ६ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील मुख्य सूत्रधार मुख्याध्यापक अमृत पाटील याने आपली मुलगी ऋतुजा हिला अन्न व औषध निरीक्षक परीक्षेत पास करण्यासाठी प्रवीण पाटील या दलालामार्फत MPSC च्या अधिकाऱ्यांशी १२ लाखांचा सौदा केला. ५ लाख रुपये रोख देऊन प्रश्नपत्रिका लीक करण्यात आली.
अमृत पाटीलने हा पेपर मुलगी ऋतुजा हिला दिला, तर ऋतुजाने तो तिचा बॉयफ्रेंड गौरव याला अभ्यासासाठी दिला. मात्र, परीक्षैनंतर दोघांमध्ये वाद होऊन ब्रेकअप झाले. ब्रेकअपचा राग मनात धरून सूड उगवण्यासाठी गौरवने थेट पोलिसांकडे व MPSC कडे या पेपरफुटीचे पुरावे सादर करत संपूर्ण घोटाळा उघडकीस आणला.
तपासातील महत्त्वाचे मुद्दे व अटक आरोपी:
-
अटक करण्यात आलेले अधिकारी: MPSC चे अधिकारी अभिजित लेंडवे, गोपाळ मराठे आणि विश्वेश्वर नकाते यांनी संगनमत करून मुख्य प्रश्नपत्रिकेतून प्रश्न चोरून स्वतंत्र पेपर लीक केला होता.
-
MPSC अधिकाऱ्यांसह ६ जण अटकेत: मुख्य आरोपी अमृत पाटील, दलाल प्रवीण पाटील आणि ३ अधिकाऱ्यांसह ६ जणांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. ऋतुजा पाटीलला नोटीस बजावण्यात आली आहे.
-
आमदार रोहित पवारांनी उठवला होता आवाज: जुलैच्या शेवटी नंदुरबार येथील एका कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्यांना दोन दिवस आधीच प्रश्न मिळाल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता.
-
व्हिसलब्लोअर की आरोपी?: तक्रारदार गौरवने नंतर तक्रार मागे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, परीक्षेआधीच पेपर त्याच्याकडे आल्याने तो केवळ व्हिसलब्लोअर आहे की यात त्याचाही सहभाग होता, याचा तपास पोलीस करत आहेत.





