भरधाव बोलेरोने दुचाकीला उडविले : बुलढाणा जिल्ह्यातील लाडणापूरजवळ भीषण अपघात
बुलढाणा-रक्षाबंधनाच्या सणासाठी सादरहून माहेरी निघालेल्या बहीण – भावाच्या दुचाकीला भरधाव वेगातील बोलेरो गाडीने जबर धडक दिल्याने आई व सात महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. मामा आणि भाचा गंभीर जखमी झाला. संग्रामपूर तालुक्यातील लाडणापूर गावाजवळ २८ ऑगस्ट सायंकाळी ही घटना घडली. संतप्त जमावाने चालकाला बेदम मारहाण करीत बोलेरो वाहन पेटवून दिले. जखमी चालकास रुग्णालयात नेताना जमाव आक्रमक झाल्याने झटापटीत काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे.
सपना संजय वासकला व पूर्वी संजय वासकला (सात महिने) अशी अपघातात ठार झालेल्या आई व मुलीची नावे आहेत. मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील जसौंदी येथील त्या रहिवासी होत्या. मृत सपनाचा मुलगा सनवीर संजय वासकला (वय ६) व मामा कमलेश भुरलाल चंगळ हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात येणाऱ्या बोरवा येथील कमलेश चंगळ हा बहीण सपना वासकला हिस रक्षाबंधनासाठी माहेरी आणण्याकरिता गेला होता. जसौंदी येथून ते दुचाकीने येत असताना टुणकी ते लाडणापूर मार्गावर लाडणापूर शिवारात एमपी १२ झेडएच ९३४२ क्रमांकाच्या बोलेरो चालकाने दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात सपना व मुलगी पूर्वी ठार झाले, तर कमलेश व सनवीर गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर संतप्त जमावाने बोलेरो चालकास मारहाण केली. तसेच वाहन पेटवून दिले. पोलिसांचा फौजफाटा आला. त्या चालकास रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेत असताना तेथेही मारहाणीचा प्रयत्न झाला. जमाव रोखताना काही पोलिस कर्मचारी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सद्यस्थितीत सोनाळा पोलिस ठाण्याभोवती जमाव जमलेला आहे.
चिमुकलीचे धड – शीर वेगळे
महिंद्रा बोलेरो जळगाव जामोदकडे भरधाव वेगाने जात असताना दुचाकीला धडक दुचाकी पंचवीस फूट दूर फेकल्या गेली. या हृदयद्रावक घटनेत चिमुकलीचे धड आणि शीर वेगळे होऊन दूर अंतरावर पडले, एवढा हा भीषण अपघात होता.





