23.5 C
Gondiā
Sunday, August 30, 2026
Home विदर्भ तिरोडा युनियन बँक चौकातील नालीवरील अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त

तिरोडा युनियन बँक चौकातील नालीवरील अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त

0
16

*पावसाचे पाणी दुकानांमध्ये शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान; नगरपरिषदेकडे तातडीने उपाययोजनेची मागणी*
चित्रा कापसे\तिरोडा —शहरातील युनियन बँक चौक परिसरात नालीवर करण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे पाण्याचा निचरा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. परिणामी पावसाचे पाणी रस्त्यावर साचून नागरिकांच्या घरांमध्ये तसेच व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये शिरत असल्याने नागरिक व व्यापारी त्रस्त झाले आहेत.
युनियन बँकेसमोरील लेआउटधारकांनी नालीसाठी जागा सोडलेली होती. मात्र, या जागेवर अतिक्रमण करून इमारत उभारण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे बन्नाडे क्लॉथ स्टोअर्स, भरणे ज्वेलर्स, महालक्ष्मी हार्डवेअर, शेतकरी कृषी केंद्र तसेच युनियन बँक परिसरात पावसाचे पाणी शिरत असून व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून रस्त्यालगत नाली बांधण्यात आली आहे. मात्र, रस्त्यावरील पाणी नालीत जाण्यासाठी आवश्यक ठिकाणी पाण्याच्या प्रवाहासाठी छिद्रे किंवा मार्ग उपलब्ध नसल्याने पाणी नालीत जाण्याऐवजी रस्त्यावरच साचत आहे. त्यामुळे रस्त्यालाच नालीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
आगाशे हार्डवेअर परिसरात पाण्याचा मोठा साठा
विशेषतः आगाशे हार्डवेअरजवळ पावसाचे मोठ्या प्रमाणात पाणी जमा होते. मात्र, तेथून पुढे पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने पाणी साचून राहते. संबंधित ठिकाणी नाली पूर्णपणे बुजलेली असून त्यामध्ये इलेक्ट्रिक केबल्सही पडलेल्या असल्याने पाण्याचा निचरा पूर्णपणे बंद झाला आहे.
परिणामी हे सर्व पाणी युनियन बँक चौकाच्या दिशेने वाहत येऊन नागरिकांच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरत आहे. वारंवार निर्माण होणाऱ्या या समस्येमुळे नागरिकांच्या आरोग्याचा तसेच व्यापाऱ्यांच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अतिक्रमण हटवून निचरा व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी
नगरपरिषद प्रशासनाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन नालीवरील अतिक्रमण हटवावे, रस्त्याचे पाणी नालीत जाण्यासाठी आवश्यक ठिकाणी मार्ग तयार करावेत तसेच आगाशे हार्डवेअरजवळील बुजलेली नाली तातडीने खुली करावी, अशी मागणी नागरिक व व्यापाऱ्यांकडून होत आहे.
पावसाळ्यात मोठी दुर्घटना किंवा व्यापाऱ्यांचे आणखी नुकसान होण्यापूर्वी प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.