*भटके-विमुक्त दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा गौरव
भंडारा, दि. ३१ : भटक्या-विमुक्त समाजातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांच्या वस्त्यांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून द्यावी, असे आवाहन राजेंद्र दोनाडकर यांनी केले.इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने सामाजिक न्याय भवन, येथे भटके-विमुक्त दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला डॉ. अविनाश नान्हे, प्रा. विजय धुरकर, शिवा कांबळे, सिमल बोकडे, आत्माराम बहिरे, श्यामराव शिवणकर, व्यंकट ठाकरे, अंकुश तांदुळकर, राजेंद्र पडारे, श्रीकांत तिजारे, विठ्ठलसिंग बलावणे आदी उपस्थित होते.
यावेळी भटके-विमुक्त समाजाच्या ऐतिहासिक संघर्षावर प्रकाश टाकण्यात आला. ब्रिटिशकालीन जाचक कायद्यामुळे या समाजावर ‘गुन्हेगार’ असा शिक्का लावण्यात आला होता. स्वातंत्र्यानंतर समाजाची या कायद्यातून मुक्तता झाली. मात्र, आजही शिक्षण, रोजगार, निवारा, मूलभूत सुविधा तसेच विविध शासकीय कागदपत्रांच्या अभावामुळे अनेक नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेताना अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकांकडे जातीचे दाखले, जन्माचे पुरावे व अन्य आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसतात. त्यामुळे प्रशासनाने वस्तीनिहाय विशेष शिबिरे घेऊन नागरिकांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
भटके-विमुक्त दिवसाचे औचित्य साधून लाखांदूर, तुमसर व भंडारा येथील आश्रमशाळांमध्ये घेण्यात आलेल्या निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी भटके-विमुक्त समाजाचा इतिहास, संघर्ष, संस्कृती व सामाजिक योगदान या विषयांवर आपल्या कलागुणांतून विचार मांडले.भटक्या-विमुक्त कल्याण परिषद भटके-विमुक्त समाजाच्या विविध प्रश्नांसाठी कार्य करीत असून, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण व शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचाही यावेळी प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच उपस्थितांना नशामुक्त भारत अभियानाची शपथ देण्यात आली. नशेपासून दूर राहून निरोगी व व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश खंगार, संचालन अनिल दिधारे यांनी तर आभार हेमंत निंबेकर यांनी मानले.





