ठेवीदारांचे पैसे अडकले, पैसे काढण्यास बंदी – ग्राहकांमध्ये खळबळ
गडचिरोली (देसाईगंज), दि. ३० : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देसाईगंज नागरी को-ऑपरेटिव्ह बँक मर्यादितवर कठोर कारवाई करत संपूर्ण व्यवहारांवर ६ महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. RBI च्या या निर्णयामुळे मायानगरी देसाईगंजच्या बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून हजारो ठेवीदारांची धाकधूक वाढली आहे.
RBI ने बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 35A (1) व कलम 56 अंतर्गत प्राप्त अधिकारात दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजीचा निर्देश क्र. http://NGP.DOS.SSM http://3.No.S276/15-02-156/2026-2027 अन्वये हे निर्बंध घातले आहेत. दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी बँकेचा व्यवसाय बंद झाल्यापासून हे निर्देश लागू झाले आहेत.
काय आहेत RBI चे निर्बंध?
– RBI च्या लेखी परवानगीशिवाय बँकेला कोणतेही नवे कर्ज मंजूर, नूतनीकरण करता येणार नाही.
– नवीन ठेवी स्वीकारणे, कोणतीही गुंतवणूक करणे, मालमत्ता विक्री किंवा हस्तांतरण करण्यावर पूर्ण बंदी.
– सर्वात कडक निर्बंध म्हणजे – ग्राहकांना बचत खाते, चालू खाते किंवा इतर कोणत्याही खात्यातून पैसे काढण्यास मनाई. बँकेची तरलता स्थिती अत्यंत खराब असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
– मात्र ठेवींवरील कर्जाचे समायोजन करण्यास आणि कर्मचारी पगार, भाडे, वीज बिल यासारख्या अत्यावश्यक खर्चास परवानगी दिली आहे. या आदेशाची प्रत बँकेच्या दर्शनी भागात लावण्यात आली आहे.
RBI ने का केली कारवाई?
RBI ने बँकेच्या संचालक मंडळ आणि व्यवस्थापनाशी वारंवार चर्चा करून सुधारणेच्या सूचना दिल्या होत्या. मात्र ठेवीदारांच्या हितरक्षणासाठी कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने आणि पर्यवेक्षकीय चिंता दूर न झाल्याने अखेर ही कारवाई करावी लागल्याचे RBI च्या पर्यवेक्षण विभागाच्या क्षेत्रीय संचालकांनी स्पष्ट केले आहे.
ग्राहकांचे काय होणार?
DICGC कायदा 1961 नुसार प्रत्येक पात्र ठेवीदाराला ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीचा विमा मिळण्यास पात्र आहे. ठेवीदारांनी बँकेत दावा सादर केल्यास त्यांना ही रक्कम मिळू शकते.RBI ने स्पष्ट केले आहे की, या निर्देशाचा अर्थ बँकेचा परवाना रद्द झाला असा नाही. बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईपर्यंत बँक निर्बंधासह व्यवसाय सुरू ठेवेल. ६ महिन्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन निर्बंधात बदल करण्याचा विचार केला जाईल.दरम्यान, निर्बंधाची माहिती मिळताच बँकेसमोर ठेवीदारांनी मोठी गर्दी केली होती. व्यापारी, शेतकरी आणि सामान्य बचतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.





