नागपूर : कुख्यात शेख अक्रम ऊर्फ ‘भुरू शेख रहमान’ (४२) याला कारखाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी ‘शरीफ टोळी’विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई केली आहे. पोलिसांच्या तपासानुसार, हा हल्ला जुन्या वैमनस्यातून पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा आरोप आहे.या प्रकरणातील कथित सूत्रधार शेख मोहसिन ऊर्फ ‘बाबा टायगर’ ऊर्फ ‘मुसा’ हा अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी शेख शरीफ शेख सलीम, शाहबाज खान ऊर्फ सलमान बिल्ला खान, आमिर बशीर शेख, मोहम्मद साहिल अल्ताफ अन्सारी आणि मोहम्मद तौफिक शेख मोहम्मद आरिफ या पाच संशयितांना अटक केली आहे.
११ ऑगस्ट रोजी सोमलवाडा चौकातील ‘हॉटेल मेमरीज’समोर भुरू याला कारखाली चिरडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. सुरुवातीला ही घटना अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र, गुन्हे शाखेच्या पथक-२च्या तपासात या घटनेमागे पूर्वनियोजित हल्ल्याचा संशय समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.त्यानंतर प्रकरणाचा तपास अपघाताच्या दिशेने न जाता खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याकडे वळवण्यात आला.
पोलिसांच्या नोंदीनुसार, नोव्हेंबर २०२३ मध्ये कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेख अशफाक शेख मुश्ताक यांच्या हत्या प्रकरणात बाबा टायगर आणि त्याच्या साथीदारांची नावे तपासात समोर आली होती.
तसेच, गुन्हेगारी कारवायांच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांनी बाबा टायगरला सहा महिन्यांसाठी हद्दपार केले होते. मात्र, हद्दपारीचा आदेश असतानाही तो शहरात आल्याचा आणि त्यानंतर भुरूवरील हल्ल्याशी त्याचा संबंध असल्याचा पोलिसांचा दावा आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, या टोळीचा संबंध गांजाच्या बेकायदेशीर व्यवहारातील मालाच्या लुटीशी असल्याचा संशय आहे. अशा व्यवहारात सहभागी असलेले लोक चोरी किंवा लुटीची तक्रार करण्यास पुढे येत नसल्याने काही घटनांची अधिकृत नोंद होत नसल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे.दरम्यान, भुरू या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देण्यात आली आहे.





