देवरी : तालुक्यातील देवरी-आमगाव राज्यमहामार्गालगत असलेल्या ग्राम भागी शिवारात निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब अचानक कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दबून एका मजुराचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला, तर तीन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज सोमवारी (३१ ऑगस्ट) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली.भागी शिवारात नव्या इमारतीचे काम वेगात सुरू असताना अचानक स्लॅबचा मोठा भाग कोसळला. यावेळी तिथे काम करणारे मजूर थेट ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या घटनेत दिनेश मदन नाईक (वय ३८, रा. मुल्ला) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने १०८ रुग्णवाहिकेने देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
३ मजूर गंभीर; गोंदियाला हलवले
या दुर्घटनेत रूपेंद्र राऊत (वय ३५, रा. कटंगी), भूमेंद्र घासले (वय ३०, रा. मुल्ला) आणि हितेंद्र खोब्रागडे (रा. भडंगा) हे तीन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. देवरी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांची चिंताजनक प्रकृती पाहता पुढील उपचारासाठी त्यांना तातडीने गोंदिया येथे हलवण्यात आले आहे. घटना घडताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत ढिगाऱ्याखालून मजुरांना बाहेर काढले. मात्र, या अपघातामुळे बांधकाम ठिकाणच्या निकृष्ट दर्जावर आणि सुरक्षेच्या अभावावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून निष्काळजीपणा करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्याची जोरदार मागणी परिसरातून होत आहे.





