गोंदिया:गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुन्या उड्डाणपुलाच्या जागी सुरू असलेल्या नवीन रेल्वे उड्डाणपुलाच्या अत्यंत संथ कारभारावर आमदार विनोद अग्रवाल यांनी आक्रमक भूमिका घेत जानेवारीपर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. या संदर्भात शासकीय विश्रामगृहात आयोजित बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या बैठकीत आमदारांनी संबंधित यंत्रणेला चांगलेच धारेवर धरले.सदर पुलाच्या रेल्वेच्या हद्दीतील बांधकामाकरीता परवानगी रेल्वेविभागाने दिल्याने या उड्डाणपुलाचे काम कोणत्याही परिस्थितीत जानेवारी २०२७ अखेरपर्यंत पूर्ण करण्याची अंतिम मुदत (डेडलाईन) आता निश्चित करण्यात आली आहे.
पुलाच्या बांधकामाला होत असलेल्या उशिरामुळे गोंदियाकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. याची दखल घेत आमदार विनोद अग्रवाल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संभाजी माने, अधीक्षक अभियंता नीता ठाकरे, कार्यकारी अभियंता रामटेके आणि संबंधित कन्स्ट्रक्शन एजन्सीचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ही आढावा बैठक घेतली. मुख्य अभियंत्यांनी बैठकीतच बांधकाम संस्थेला विलंबाबाबत जाब विचारला. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यापर्यंत पिलर, गर्डर, स्लॅब आणि ॲप्रोच सिमेंट रोडचे काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

हड्डीटोली उड्डाणपुलालाही गती देण्याच्या सूचना
या बैठकीत आमदारांनी शहरातील महत्त्वाच्या हड्डीटोली उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामाकडेही लक्ष वेधले. या पुलाच्या बांधकामाला गती देतानाच, रेल्वे मार्गावरील मुख्य भागाचे काम समांतर पद्धतीने पूर्ण करावे, जेणेकरून भविष्यात नागरिकांना पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही, अशा सूचना त्यांनी दिल्या.
या बैठकीत आमदारांनी शहरातील महत्त्वाच्या हड्डीटोली उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामाकडेही लक्ष वेधले. या पुलाच्या बांधकामाला गती देतानाच, रेल्वे मार्गावरील मुख्य भागाचे काम समांतर पद्धतीने पूर्ण करावे, जेणेकरून भविष्यात नागरिकांना पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही, अशा सूचना त्यांनी दिल्या.
“शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या उड्डाणपुलांच्या कामात यापुढे कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. संबंधित विभाग आणि बांधकाम संस्थेने आपापसातील तांत्रिक व प्रशासकीय अडचणी तात्काळ सोडवून युद्धपातळीवर काम करावे,” असा स्पष्ट इशारा आमदार विनोद अग्रवाल यांनी यावेळी दिला.




