23.6 C
Gondiā
Friday, September 4, 2026
Home विदर्भ दत्तोरा ग्रामपंचायतीसमोर युवकांचे आंदोलन; विविध मागण्यांसाठी प्रशासनाचे लक्ष वेधले

दत्तोरा ग्रामपंचायतीसमोर युवकांचे आंदोलन; विविध मागण्यांसाठी प्रशासनाचे लक्ष वेधले

0
89

गोंदिया,दि.०३- तालुक्यातील दत्तोरा गावातील विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील युवकांनी आज ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन केले.दत्तोरा ग्रामपंचायतीची इमारत बांधून पूर्ण होऊनही अद्याप तिचा योग्य पद्धतीने वापर सुरू झालेला नसल्याने युवकांनी नाराजी व्यक्त केली. लाखो रुपये खर्च करून ग्रामपंचायत इमारत उभारण्यात आली असताना ती नागरिकांच्या सेवेसाठी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित का करण्यात आली नाही, असा सवाल आंदोलनकर्त्या युवकांनी उपस्थित केला.

गावातील मूलभूत सुविधा, विकासकामे तसेच नागरिकांच्या विविध समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.युवकांनी विविध मागण्यांचे निवेदन ग्रामपंचायत प्रशासनाकडे सादर केले. मागण्यांवर लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही युवकांनी दिला.