28.6 C
Gondiā
Friday, September 4, 2026
Home शैक्षणिक लोकवर्गणीतून शाळेचा कायापालट; जिल्हाधिकारी सावन कुमार भारावले

लोकवर्गणीतून शाळेचा कायापालट; जिल्हाधिकारी सावन कुमार भारावले

0
2

सोमनाळा बूजला ‘मॉडेल गाव’ बनविण्यासाठी प्रयत्न करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन
भंडारा,दि.04:सोमनाळा बूज,:पवनी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सोमनाळा बूज येथे दिनांक ३ सप्टेंबर २०२६ रोजी लोकवर्गणीतून साकारलेल्या नूतन वाचनालयाचा लोकार्पण सोहळा भंडारा जिल्हाधिकारी सावन कुमार (IAS) यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडला. यावेळी लोकसहभागातून शाळेत करण्यात आलेल्या विविध विकासकामांची पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेच्या उपक्रमांचे कौतुक केले.
लोकवर्गणी आणि ग्रामस्थांच्या सामूहिक सहभागातून ग्रामीण भागातील शाळेचा झालेला कायापालट पाहून जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी समाधान व्यक्त केले. “लोकसहभागातून शाळेचा केलेला हा कायापालट निश्चितच प्रेरणादायी आहे. अशाच पद्धतीने इतर गावांनीही पुढाकार घ्यावा,” असे ते म्हणाले. तसेच सोमनाळा बूज गावाचा सर्वांगीण विकास करून गावाला ‘मॉडेल गाव’ म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.
विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण मिळावे यासाठी शाळेला डिजिटल क्लासरूम उपलब्ध करून देण्याची घोषणाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केली. त्यांच्या या घोषणेमुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
लोकवर्गणीतून साकारलेल्या नूतन वाचनालयामुळे विद्यार्थ्यांना अवांतर वाचन, सामान्यज्ञान, विज्ञान, साहित्य तसेच विविध स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासोबतच त्यांच्या विचारशक्ती आणि कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी हे वाचनालय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना सरपंच सौ. ममता गिरडकर यांनी जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी सोमनाळा बूज सारख्या छोट्याशा गावातील शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचा आणि ग्रामस्थांचा उत्साह वाढवल्या बद्दल त्यांचे आभार मानले. लोकवर्गणीच्या माध्यमातून शाळेत मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल घडवून गावाला वेगळी ओळख आणि उंची मिळवून दिल्याबद्दल त्यांनी लोकवर्गणी संकल्पना व
कार्यसमन्वयक दिगंबर कुंडलिक वंजारी यांचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी सौ. शैलजा वाघ, तहसीलदार पवनी श्री. सतीश साळवे,गटविकास अधिकारी पवनी श्री. नितेश माने, सरपंच सौ. ममता गिरडकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दुर्योधन बोरकर, मुख्याध्यापक हरिदास घावले, पोलीस पाटील मोरेश्वर भुरे, उपसरपंच देवानंद बोरकर, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष रमेश वैद्य, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष धनराज वैद्य, शिक्षणतज्ञ तथा लोकवर्गणी संकल्पना व कार्यसमन्वयक दिगंबर कुंडलिक वंजारी, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा शिल्पा वैद्य यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दिगंबर कुंडलिक वंजारी लोकवर्गणी संकल्पना व कार्यसमन्वयक,सहाय्यक शिक्षक दीपक वैरागडे, योगेश बोरकर, माया दौंड, प्रतिक्षा शेंगुडे,रोहिणी वैद्य, भारती वंजारी, सुषमा वाघमारे तसेच शाळा व्यवस्थापन समितीने सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन प्रतिक्षा शेंगुडे व दिगंबर वंजारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन योगेश बोरकर सर यांनी केले. लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून सहकार्य केल्यामुळेच शाळेतील झालेले आश्चर्यकारक वाटणारे बदल शक्य झाले असून जिल्हाधिकारी साहेब अगदी छोट्याशा असलेल्या आमच्या गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोमनाळा बूज येथे आले ही लोकवर्गणी मधून शाळेत केलेल्या कामांची पावती आहे.