अर्जुनी/मोरगाव, दि. ३ सप्टेंबर २०२६ : येथील शिवप्रसाद सदानंद जैस्वाल महाविद्यालय, अर्जुनी/मोरगाव येथे रसायनशास्त्र विभागांतर्गत केमिकल सोसायटी व भौतिकशास्त्र विभागांतर्गत फिजिक्स सोसायटी यांच्या पुनर्स्थापनेचा कार्यक्रम दिनांक ३ सप्टेंबर रोजीउत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. बी. एम. राठोड उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्री मयंकजी जायस्वाल, सहसचिव, श्री दुर्गा शिक्षण संस्थान, अर्जुनी/मोरगाव उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रमुख संसाधन व्यक्ती म्हणून डॉ. नरेश बन्सोड, एम. जी. महाविद्यालय, आरमोरी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
याप्रसंगी डॉ. लक्ष्मीकांत कपगते, आयक्यूएसी समन्वयक, डॉ. एन. डी. विलायतकर, विभागप्रमुख, रसायनशास्त्र विभाग तसेच डॉ. डी. एल. चौधरी, विभागप्रमुख, भौतिकशास्त्र विभाग यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एन. डी. विलायतकर यांनी केले. त्यांनी रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र विषयांचे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वैज्ञानिक विकासातील महत्त्व अधोरेखित केले. यावेळी केमिकल सोसायटीचे उद्घाटन डॉ. नरेश बन्सोड यांच्या हस्ते करण्यात आले, तर फिजिक्स सोसायटीचे उद्घाटन प्रमुख अतिथी श्री मयंकजी जायस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. नरेश बन्सोड यांनी “मटेरियल सायन्समधील करिअरच्या संधी” या विषयावर अत्यंत माहितीपूर्ण व मार्गदर्शनपर सादरीकरण केले. त्यांनी मटेरियल सायन्स क्षेत्रातील विविध करिअरच्या संधी, संशोधनाचे महत्त्व, आधुनिक उद्योगांमधील उपयोग तसेच विद्यार्थ्यांनी संशोधन आणि नवोपक्रमाकडे वळण्याची गरज यावर सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात कार्यकारी प्राचार्य डॉ. बी. एम. राठोड यांनी विद्यार्थ्यांनी रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र सोसायटीच्या माध्यमातून विविध वैज्ञानिक उपक्रम, संशोधन, चर्चासत्रे, प्रकल्प व नवोपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होऊन त्यांच्या करिअरला नवी दिशा मिळेल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कु. मीरा उइके हिने केले तर आभार योगेश मरसकोल्हे यानी मानले. कार्यक्रमाच्या आयोजना करिता डॉ आशिष कावळे, डॉ यात्रिक भगत, प्रा पंकज उके , प्रा प्रिया नागदेवे व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.





