24.1 C
Gondiā
Saturday, September 5, 2026
Home विदर्भ मरामजोब उड्डाणपुलावर लोखंडी सळया वाहून नेणारा ट्रक अपघातात ग्रस्त; चालक गंभीर, महामार्गावरील...

मरामजोब उड्डाणपुलावर लोखंडी सळया वाहून नेणारा ट्रक अपघातात ग्रस्त; चालक गंभीर, महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

0
10

गोंदिया:देवरी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील मरामजोब उड्डाणपुलावर गुरुवारी (३ सप्टेंबर) दुपारी २ वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. लोखंडी सळयांनी भरलेल्या एका मालवाहू ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट पुलाच्या दुभाजकाला (डिव्हायडर) जाऊन धडकला. या अपघातात ट्रकचालक गंभीर जखमी झाला असून, ट्रकमधील लोखंडी सळया रस्त्यावर विखुरल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, लोखंडी सळया घेऊन ट्रक (क्र. CG 04 PC 7821) रायगडवरून नागपूरच्या दिशेने जात होता. मरामजोब उड्डाणपुलावर पोहोचताच अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक दुसऱ्या बाजूला जाऊन दुभाजकावर जोरदार धडकला. धडक इतकी भीषण होती की ट्रकमधील मोठ्या प्रमाणातील लोखंडी सळया महामार्गावर पसरल्या.

या अपघातात उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेला ट्रकचालक सायन उरुस यादव (वय २५) हा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमी चालकाला तात्काळ देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रस्त्यावर सांडलेल्या सळया बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम पोलिसांकडून करण्यात आले.