22.6 C
Gondiā
Saturday, September 5, 2026
Home विदर्भ तुमसर शहरात डीजेच्या भीषण आवाजावर पोलिसांचा धाक उरलाय का?

तुमसर शहरात डीजेच्या भीषण आवाजावर पोलिसांचा धाक उरलाय का?

0
8

स्वराज्य युवा एकता फाऊंडेशनचे पोलीस ठाणेदारांना निवेदन; डेसिबल मीटरने आवाज मोजून कडक कारवाई करण्याची मागणी

​तुमसर (प्रतिनिधी): सण-उत्सवांच्या नावाखाली तुमसर शहरात चालणारा डीजेचा अनधिकृत व कानठळ्या बसवणारा आवाज आता नागरिकांच्या जीवावर उठला आहे. या तीव्र ध्वनीप्रदूषणावर तत्काळ आळा घालावा, मिरवणुकीत ‘डेसिबल मीटर’चा वापर करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई करावी, अशी रोखठोक मागणी ‘स्वराज्य युवा एकता फाऊंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम यांच्या नेतृत्वात तुमसर पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
​तुमसर शहरात विविध धार्मिक व सामाजिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. मात्र, अलीकडच्या काळात मिरवणुकांमध्ये अथांग आणि अनियंत्रित आवाजात डीजे वाजवण्याची धोकादायक प्रथा वाढली आहे. या भीषण आवाजामुळे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कंपनांमुळे शहरातील वृद्ध नागरिक, हृदयरोगी आणि आजारी व्यक्तींना तीव्र मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच लहान मुलांच्या कानांवर व मेंदूवर याचा गंभीर परिणाम होत असून, एमपीएससी, यूपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासात मोठा व्यत्यय येत आहे. ​मा. सर्वोच्च न्यायालय आणि पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार ध्वनी प्रदूषणाची एक विशिष्ट मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तरीही या नियमांना धाब्यावर बसवून क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने जास्त आवाजात डीजे धडधडत आहेत. या पार्श्वभूमीवर स्वराज्य युवा एकता फाऊंडेशनने आक्रमक भूमिका घेत पोलीस प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.
​स्वराज्य फाऊंडेशनच्या प्रमुख मागण्या: शहरातील सर्व मिरवणुकांमध्ये डीजेच्या आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रत्यक्ष ‘डेसिबल मीटर’चा वापर करावा. ​ठरवून दिलेल्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या डीजे चालकांवर आणि आयोजकांवर तात्काळ कठोर कायदेशीर व दंडात्मक कारवाई व्हावी. ​रुग्णालय, शाळा परिसर यांसारख्या शांतता क्षेत्रात आणि रात्रीच्या वेळेत डीजे वाजवण्यावर पूर्णपणे बंदी घालून नियमांचे कडक पालन करून घ्यावे. ​सदर निवेदन तुमसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांना सादर करण्यात आले. सदर निवेदनाची प्रत माहिती व पुढील उचित कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी, भंडारा यांच्याकडेही पाठवण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांना ​निवेदन देतेवेळी स्वराज्य युवा एकता फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते हर्ष कठाने, सलमान पठाण, गौतम वर्मा, अश्विन देशमुख व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. शहरात शांतता व आरोग्यदायी वातावरण टिकवण्यासाठी पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे आता संपूर्ण तुमसरवासीयांचे लक्ष लागले आहे.