27.8 C
Gondiā
Saturday, September 5, 2026
Home शैक्षणिक इंपीरियल कॉलेज ऑफ फार्मसी, तिरोडा येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

इंपीरियल कॉलेज ऑफ फार्मसी, तिरोडा येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

0
10

तिरोडा- विद्यार्थ्यांच्या जीवनाला व करिअरला योग्य दिशा देणाऱ्या शिक्षकांच्या अमूल्य योगदानाचा सन्मान करण्यासाठी प्रगत विद्या फाउंडेशनच्या इंपीरियल कॉलेज ऑफ फार्मसी, तिरोडा येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचे महान शिक्षक, तत्त्वज्ञ व माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर, प्राचार्य व शिक्षकांच्या हस्ते पारंपरिक दीपप्रज्वलनाने करण्यात आली. ज्ञानाचा प्रकाश आणि शिक्षणाच्या माध्यमातून अज्ञानाचा अंधकार दूर करण्याचे प्रतीक म्हणून दीपप्रज्वलनाचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.
शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे महत्त्व, समाजातील त्यांचे योगदान तसेच भावी पिढी घडविण्यातील शिक्षकांची भूमिका याविषयी प्रभावीपणे आपले विचार मांडले. या स्पर्धेत दिव्या गौतम हिने प्रथम, तर सानिया भगत हिने द्वितीय क्रमांक पटकावला. दोन्ही विद्यार्थिनींच्या आत्मविश्वासपूर्ण भाषणाचे, प्रभावी संवादकौशल्याचे व विचारपूर्ण मांडणीचे उपस्थितांनी कौतुक केले.
यावेळी प्रगत विद्या फाउंडेशनचे सचिव श्री. अनूप बोंपचे यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देत, प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्यामागे शिक्षकांची मार्गदर्शक शक्ती असते, असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचा सदैव आदर करावा व त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. प्रलय ए. बारहेवार यांनीही शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देत, अध्यापन म्हणजे केवळ शैक्षणिक ज्ञान देणे नव्हे, तर विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा व चारित्र्याचा विकास करणे आणि जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम बनविणे ही शिक्षकांची महत्त्वपूर्ण जबाबदारी असल्याचे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक करून भाषण स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी विद्यार्थी, शिक्षक व आयोजकांचे आभार मानण्यात आले. शिक्षकांप्रती आदर, कृतज्ञता आणि त्यांच्या योगदानाचा गौरव करणारा हा सोहळा इंपीरियल कॉलेज ऑफ फार्मसी परिवारासाठी संस्मरणीय ठरला.