खासदार राजेंद्र जैन व आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते थाटात सोहळा; ‘बेरार टाईम्स’च्या पाठपुराव्याला यश
गोंदिया: गोंदिया शहराचे मुख्य केंद्रस्थान असलेल्या जयस्तंभ चौक येथील जुन्या बसस्थानकाच्या विकास, सौंदर्यीकरण आणि आधुनिक नवनिर्माण कार्याचा भूमिपूजन सोहळा खासदार राजेंद्र जैन व आमदार विनोद अग्रवाल यांच्या शुभहस्ते आज अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी ‘बेरार टाईम्स’ या वृत्तपत्राने सातत्याने आवाज उठवून पाठपुरावा केला होता, ज्यामुळे या कामाला गती मिळाली आहे.
या सोहळ्याला संबोधित करताना खासदार राजेंद्र जैन यांनी सांगितले की, “खासदार प्रफुल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून गोंदिया शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती दिली जात आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधेसाठी समृद्धी महामार्ग, हवाई सेवा आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीवर विशेष भर दिला जात आहे.” पुढे बोलताना त्यांनी नमूद केले की, मुंबई-नागपूर-गोंदिया समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून गोंदियासह बालाघाट, आमगाव, देवरी आणि कोहमारा क्षेत्राची रस्ते वाहतूक अधिक मजबूत होणार आहे. जयस्तंभ चौकातील जुन्या बसस्थानकाच्या या नव्या आधुनिक स्वरूपामुळे प्रवाशांना आणि शहरवासीयांना जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक सुविधा मिळतील.
या भव्य भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप बोरकर, उपाध्यक्ष संतोष पटले, दिनेश दादरीवाल, रोहित अग्रवाल, प्रदीप माने, कल्लू यादव, सतीश देशमुख, अभय अग्रवाल, निर्मला मिश्रा, विवेक मिश्रा, श्रीमती कुलकर्णी, नेहा यादव, सीखा सुनपुरे, कैलाश यादव, अजय यादव, अनुज जायसवाल, राज शुक्ला, केतन तुरकर यांच्यासह विविध समितीचे सभापती, नगरसेवक, नगरपरिषदेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.





