गोरेगाव दि.९ सप्टेंबर:महिलांनी केवळ बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारांपुरते मर्यादित न राहता उद्योग, व्यवसाय आणि रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहावे. त्यासाठी शासनाच्या विविध योजना व उपलब्ध संधींचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे उद्घाटक लायकराम भेंडारकर यांनी केले.
गुरुकृपा लॉन, गोरेगाव येथे महिला आर्थिक विकास महामंडळ, गोंदिया यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘नवतेजश्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पा’ अंतर्गत तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्र, गोरेगाव यांच्या १७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी लायकराम भेंडारकर मार्गदर्शन करत होते.
यावेळी उपस्थित महिला भगिनींशी संवाद साधताना भेंडारकर यांनी तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. महिला सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन, स्वयंरोजगार तसेच ग्रामीण भागातील महिलांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजना व संधींचा प्रभावीपणे उपयोग करण्याचे आवाहन त्यांनी केले.
ग्रामीण महिलांमध्ये कष्ट करण्याची क्षमता, जिद्द आणि कल्पकता मोठ्या प्रमाणात आहे. या क्षमतेला योग्य प्रशिक्षण, बाजारपेठ आणि आर्थिक पाठबळ मिळाल्यास महिला आपल्या कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसोबतच गावाच्या आणि परिसराच्या आर्थिक विकासातही महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात, असे भेंडारकर यांनी सांगितले. महिला बचत गटांच्या माध्यमातून निर्माण झालेली आर्थिक ताकद ही केवळ कुटुंबाच्या विकासाची नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाचीदेखील मोठी शक्ती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महिलांनी एकजुटीने पुढे जात स्वावलंबी, सक्षम आणि उद्योजक महिला म्हणून आपली नवी ओळख निर्माण करावी. तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून अधिकाधिक महिलांना उद्योग, व्यवसाय आणि रोजगाराच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
कार्यक्रमाला सी.एम.आर.सी.च्या अध्यक्ष नलिना डोंगरे, पंचायत समिती गोरेगावच्या सभापती चित्रलेखा चौधरी, जिल्हा परिषद सदस्य हनवंत वट्टी, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे, माजी उपसरपंच रविकांत तरोणे, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, कृषी अधिकारी ललन राजपुत, नगरसेविका सुष्मा अगळे, माजी सभापती आरती चव्हान, सी.एम.आर.सी.च्या सचिव तेजेस्वरी चौरागडे, सहायक आयुक्त पशुविभाग गिरीष गभणे, आरोग्य विभागाचे प्रशांत मेश्राम, सी.एम.आर.सी.च्या व्यवस्थापक योगिता राउत यांच्यासह गीता खंडाईत, लक्ष्मी ठाकुर, नंदनी चाचेरे, माया काळसर्पे, रेखा शिवणकर, लता भोयर, सीमा रहांगडाले, ललिता लटैया, गुरवताई तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.





