25.3 C
Gondiā
Tuesday, September 8, 2026
Home विदर्भ अन्न व औषध प्रशासनाकडून शास्त्री वार्डातील नामांकित रेस्टॉरंटचा अन्न परवाना तात्काळ निलंबित

अन्न व औषध प्रशासनाकडून शास्त्री वार्डातील नामांकित रेस्टॉरंटचा अन्न परवाना तात्काळ निलंबित

0
5

गोंदिया, दि.8 : गोंदिया शहरातील शास्त्री प्रभाग स्थित एका अन्न आस्थापनेगध्ये जनआरोग्यास अत्यंत घातक ठरणारी अस्वच्छता आणि गंभीर त्रुटी आढळून आल्याने, अन्न व औषध प्रशासनाने सदर रेस्टॉरंटचा अत्र परवाना तात्काळ प्रभावाने (Forthwith Suspension) निलंबित केला आहे.अन्न सुरक्षा अधिकारी चै. ज. नानोटे यांनी दि.7 सप्टेंबर 2026 रोजी केलेल्या ऑनलाईन तपासणीदरम्यान या आस्थापनेत खालीलप्रमाणे गंभीर गैरसोयी व अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळून आले.

·     दूषित व कुजलेला कच्चा माल : स्वयंपाकघरात टोमॅटो कुजलेले, बटाटे उंदरांनी कुरतडलेले व अळ्यांनी दूषित स्थितीत आढळले.

·    मुदतबाह्य व विना-लेबल उत्पादने : सनफ्लॉवर वनस्पती/तेल, ब्रेड, स्वीट कॉर्न हे मुदतबाह्य (Expired) तसेच मगज बीज व चाट मसाल्याची पाकिटे विना-लेबल आढळली.

·     कचरा व किटकांचा धोका : कचऱ्याचे डबे उघडे व थेट गॅस शेजारी ठेवलेले आढळले, ज्यामुळे किटक व उंदरांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली.

·   परस्परांत दूषितीकरण (Cross-Contamination) : शाकाहारी व मांसाहारी अन्नासाठी वापरली जाणारी भांडी वेगळी नव्हती; तसेच कच्चे मांस पिण्याच्या पाण्याच्या नळाखाली अयोग्य रितीने धुतले जात होते.

·  अस्वच्छता व पायाभूत सुविधांचा अभाव : व्हेंटिलेशन व चिमणीची स्वच्छता न केल्याने प्रचंड ग्रीस/काजळी साचली होती, तसेच ड्रेनेज अयोग्य असल्याने सांडपाणी साचत असल्याचे दिसून आले.

या सर्व त्रुटींमुळे ग्राहकांना तीव्र अन्नविषबाधा, गॅस्ट्रोएन्टेरिटिस आणि इतर संसर्गजन्य आजार होण्याचा थेट धोका निर्माण झाला होता.व्यापक जनहित व जनआरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी पदनिर्देशित अधिकारी तथा सहायक आयुक्त (अन्न) अमृता शिर्के यांनी सदर अन्न आस्थापनेचा परवाना दि.8 सप्टेंबर 2026 पासून पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहे.निलंबन कालावधीत सदर आस्थापनेत कोणत्याही प्रकारचा अन्न व्यवसाय करण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, उल्लंघन केल्यास कडक कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

प्रशासनाकडून जिल्ह्यातील अन्न आस्थापनांची तपासणी मोहीम सातत्याने सुरू राहील. तपासणीदरम्यान स्वच्छतेबाबत किंवा अन्नाच्या दर्जाबाबत गंभीर त्रुटी आढळून आल्यास संबंधित आस्थापनेचा परवाना तात्काळ निलंबित/रद्द करण्यात येईल आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. असे पदनिर्देशित अधिकारी तथा सहायक आयुक्त (अन्न) अमृता शिर्के यांनी कळविले आहे.