अर्जुनी मोरगाव:अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राच्या दौऱ्यावर आलेले महाराष्ट्र विधानसभेचे आमदार रोहित पवार यांची ‘अन्नदाता धान उत्पादक संघ’ (अर्जुनी मोरगाव) च्या वतीने भेट घेऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी धान उत्पादक शेतकऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न, धानाचा बोनस, आधारभूत दरात वाढ, नवीन वीज कनेक्शन आणि ई-पीक पाहणीतील अडचणींबाबत सविस्तर चर्चा करून विधानसभेत हे प्रश्न धसास लावण्याची आग्रही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
सध्या रासायनिक खते, किटकनाशके, डिझेलचे वाढलेले दर आणि शेतमजुरीमुळे शेतीचा उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे. अशा स्थितीत शासनाने जाहीर केलेला २४४१ रुपये आधारभूत दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही. त्यामुळे छत्तीसगडच्या धर्तीवर धानाला ३५०० रुपये आधारभूत दर देण्यात यावा, अशी प्रमुख मागणी संघटनेने केली.
“धानाला योग्य भाव आणि थकीत बोनस न मिळाल्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या या रास्त मागण्यांसाठी मुख्यमंत्री आणि शासनाशी सकारात्मक चर्चा करून विधानसभेत प्रश्न उपस्थित केला जाईल.”— आ. रोहित पवार
संघाच्या प्रमुख मागण्या:
-
धानाचा बोनस: रखडलेला धानाचा बोनस तातडीने मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात यावा.
-
आधारभूत दर: वाढता खर्च लक्षात घेता छत्तीसगडच्या धर्तीवर धानाला ३५०० रुपये प्रति क्विंटल दर द्यावा.
-
प्रोत्साहन राशी: नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे.
-
वीज जोडणी: कृषी पंपांसाठी थकीत/नवीन विद्युत कनेक्शन देण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करावी.
-
ई-पीक पाहणी सुविधा: बाहेरगावी राहणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी मोबाईलद्वारे ई-पीक पाहणी सुलभ करावी.
या बैठकीदरम्यान माजी आमदार चरणभाऊ वाघमारे, गंगाधरजी परशुरामकर, यशवंतजी परशुरामकर, ललितकुमार बाळबुद्धे, शंकरजी लोगडे, घनश्यामजी भेंडारकर, डोये महाराज यांच्यासह अन्नदाता धान उत्पादक संघटनेचे पदाधिकारी आणि परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.





