30.3 C
Gondiā
Thursday, September 10, 2026
Home विदर्भ स्थायी समितीत भाजप पदाधिकाऱ्यांमध्येच जुंपली: माजी अध्यक्षांची बांधकाम सभापतींवर जोरदार फटकेबाजी

स्थायी समितीत भाजप पदाधिकाऱ्यांमध्येच जुंपली: माजी अध्यक्षांची बांधकाम सभापतींवर जोरदार फटकेबाजी

0
81

गोंदिया जि. प. स्थायी समितीत १९ कामांच्या निविदांवरून गदारोळ!

सत्ताधारी पक्षातील समन्वयाचा उडाला बडगा; संजय टेंभरे यांचीही माजी अध्यक्षांच्या बाजूने टोलेबाजी

गोंदिया:गोंदिया जिल्हा परिषदेच्या बुधवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील अंतर्गत कलह आणि समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर आला आहे. बांधकाम विभागाच्या १९ कामांच्या करारांवरून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विद्यमान बांधकाम सभापती यांच्यात थेट शाब्दिक चकमक उडाल्याने बैठकीत एकच खळबळ उडाली आणि जोरदार गदारोळ माजला.

मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीचे कामकाज सुरू होताच बांधकाम विभागाच्या विविध विकासकामांवर चर्चेला सुरुवात झाली. बांधकाम सभापती डॉ. लक्ष्मण भगत यांनी आपल्याच विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र लिहून तब्बल १९ कामांचे करारनामे थांबविण्याचे व निविदा प्रक्रिया रद्द करण्याचे निर्देश दिले होते. या पत्रावरून सभेत अचानक वातावरण तापले. रद्द करण्यात आलेली बहुतांश कामे ही माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्याशी संबंधित असल्याचा मुद्दा उपस्थित होताच, रहांगडाले यांनी जागेवर उभे राहून या मनमानी कारभारावर कडक शब्दांत आक्षेप घेतला.

‘शांत’ सभापती पडले बॅकफूटवर!

भारतीय जनता पक्षाची जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता असतानाही पक्षाच्याच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या या वर्चस्ववादाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. शांत आणि संयमी स्वभावाचे मानले जाणारे बांधकाम सभापती डॉ. लक्ष्मण भगत यांना माजी अध्यक्षांच्या आक्रमक पवित्र्यापुढे आपली बाजू प्रभावीपणे मांडता आली नाही. त्यातच माजी बांधकाम सभापती व विद्यमान जि. प. सदस्य संजय टेंभरे यांनीही पंकज रहांगडाले यांची बाजू लावून धरत बांधकाम सभापती चुकीचे व मनमानी निर्णय घेत असल्याचा घणाघाती आरोप केला.

प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच राडा!

हा सगळा थरार जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, महिला व बालकल्याण सभापती पौर्णिमा ढेंगे, कृषी व पशुसंवर्धन सभापती दीपा चंद्रिकापुरे, समाजकल्याण सभापती रजनी कुंभरे यांच्यासह विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समक्ष घडला.विकासकामांवरून सत्ताधारी पक्षातच जुंपल्यामुळे आणि अंतर्गत गटबाजी उघडी पडल्याने आगामी काळात या १९ कामांच्या मुद्द्यावरून गोंदिया जिल्हा परिषदेचे राजकारण आणखी तापण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.