28.1 C
Gondiā
Thursday, September 10, 2026
Home विदर्भ तेढा परिसरातील भात पिकाला मोठा फटका: खोडकिडा, करपा अन् तुडतुड्यांच्या प्रादुर्भावाने बळीराजा...

तेढा परिसरातील भात पिकाला मोठा फटका: खोडकिडा, करपा अन् तुडतुड्यांच्या प्रादुर्भावाने बळीराजा संकटात

0
11

प्रशासनाने तातडीने पंचनामे करून प्रतिहेक्टरी २५ हजारांची मदत द्यावी: माजी जि. प. सदस्य खुमेंद्र मेंढे यांची जोरदार मागणी

गोंदिया (तेढा):“धान पीक पूर्णपणे संकटात सापडले असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. कृषी विभाग आणि महसूल प्रशासनाने विलंब न करता संयुक्तपणे शेतात जाऊन बाधित पिकांचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत. पिकांची झालेली दुरवस्था लक्षात घेता बाधित शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी २५ हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी. तसेच कृषी अधिकाऱ्यांनी केवळ कागदावर नियोजन न करता प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मोफत फवारणी औषधे व योग्य तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे,” अशी मागणी माजी जि.प.सदस्य खुमेंद्र मेंढे यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या सततच्या बदलांमुळे आणि दमट हवामानामुळे तेढा परिसरातील धान (भात) पिकावर विविध रोग आणि किडींचा भयंकर प्रादुर्भाव झाला आहे. ऐन वाढीच्या आणि गर्भावस्थेच्या संवेदनशील काळातच पिकावर खोडकिडा, करपा, तसेच मावा आणि तुडतुड्यांनी जोरदार हल्ला चढवल्यामुळे हाताशी आलेले पीक डोळ्यांदेखत वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून, परिसरातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे.

हवामानातील अनुकूल परिस्थितीमुळे या रोगांचा प्रसार अत्यंत वेगाने होत आहे. खोडकिड्याच्या प्रादुर्भावामुळे भाताची रोपे सुकून पांढरी व तांबूस पडत आहेत. त्यातच रस शोषणाऱ्या मावा व तुडतुड्यांमुळे झाडे पिवळी पडून कोमेजून जात आहेत. पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्जाऊ रक्कम उभारून महागड्या कीटकनाशकांची फवारणी केली; मात्र तरीही रोग नियंत्रणात येत नसल्याने शेतकऱ्यांचा झालेला मोठा खर्च पाण्यात गेला आहे. यामुळे बळीराजा दुहेरी आर्थिक संकटात सापडला आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी सदस्य खुमेंद्र मेंढे यांनी परिसरातील शेतकऱ्यांसह प्रशासनाकडे आक्रमक मागणी केली आहे.ऐन मोसमात पीक हातचे जाण्याची वेळ आल्याने शेतकरी वर्ग अत्यंत चिंतेत असून, आता शासन व प्रशासन याकडे किती गांभीर्याने पाहते आणि कधी दिलासा देते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.