तावशी-संभाजीनगर महामार्गावरील घटना; ४ ते ५ वर्षे वयाचा चितळ जागीच मृत
वनविभागाकडून पंचनामा; अज्ञात वाहनाचा शोध सुरू
अर्जुनी-मोर-अज्ञात वाहनाच्या धडकेत एका नर चितळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवार, दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास तावशी-संभाजीनगर महामार्गावर घडली. या घटनेमुळे वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, अंदाजे ४ ते ५ वर्षे वयाचा नर चितळ महामार्ग ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाची धडक बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. धडक एवढी जोरदार होती की, चितळाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
तावशी-संभाजीनगर महामार्गावर नर चितळ मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या परिसरात वन्यप्राण्यांची वर्दळ असल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
महामार्गावर वाहनांची वाढती वर्दळ आणि वाहनांचा वेग लक्षात घेता वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी वन्यजीवप्रेमींकडून होत आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभाग अर्जुनी-मोरगावचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृत चितळाचा पंचनामा करण्यात आला असून, पुढील वनवैधानिक कार्यवाही सुरू आहे.या घटनेचा तपास वनपरिक्षेत्राधिकारी बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक परशुरामकर, सतीश शेंदरे, रविंद्र सांदेवार तसेच वनमजूर दिलीप डोंगरवार करीत आहेत.दरम्यान, चितळाला धडक देणारे वाहन कोणते होते, वाहनाचा चालक कोण होता आणि अपघात नेमका कशा परिस्थितीत घडला, याचा शोध वनविभागाकडून घेतला जात आहे.





