कोहळी समाजबांधवांचे डुग्गीपार पोलीस ठाण्यात निवेदन; SIT स्थापन करण्याची मागणी
सडक अर्जुनी, दि. १३ सप्टेंबर : पळसगाव येथील सौ. कुसुमबाई चैतराम कापगते यांच्या दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या अमानुष हत्येच्या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या हत्येतील आरोपींचा तात्काळ शोध घेऊन त्यांना अटक करावी तसेच प्रकरणाचा तपास जलदगतीने व निष्पक्षपणे करावा, या मागणीसाठी कोहळी समाजबांधवांच्या वतीने डुग्गीपार पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.
घटनेला 11 दिवस उलटूनही आरोपींचा ठोस शोध लागलेला नसल्याने पीडित कुटुंबीयांमध्ये चिंता निर्माण झाली असून समाजबांधवांमध्येही अस्वस्थता आहे. त्यामुळे पोलिसांनी तपासाला गती देऊन या प्रकरणातील दोषींना तातडीने कायद्याच्या कक्षेत आणावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
हत्येमागील कारण, संभाव्य कट तसेच घटनेत सहभागी असलेल्या व्यक्तींचा सखोल तपास करण्यात यावा. घटनास्थळ व परिसरातील CCTV फुटेज, मोबाईल रेकॉर्ड, तांत्रिक पुरावे तसेच उपलब्ध अन्य पुराव्यांची तातडीने तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच या गंभीर प्रकरणाचा तपास अधिक प्रभावीपणे करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करावे, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.
तपासात कोणतीही दिरंगाई होऊ नये, पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि आरोपी निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका समाजबांधवांनी व्यक्त केली.
“कुसुमबाई कापगते यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण कोहळी समाज त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. आरोपींचा तात्काळ शोध घेऊन त्यांना अटक होईपर्यंत हा लढा सुरूच राहील,” असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
निवेदन डुग्गीपार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांना देण्यात आले.
यावेळी प्रकाश बाळबुध्दे (अध्यक्ष, कोहळी समाज विकास मंडळ), गंगाधर परशुरामकर (मार्गदर्शक), अमोल पाटील मुंगमोडे (उपाध्यक्ष, कोहळी समाज विकास मंडळ), किशोर डोंगरवार, चामेश्वर गहाणे, डॉ. गजानन डोंगरवार, भारती लोथे (सरपंच), प्रवीण गहाणे (सरपंच), पराग कापगते, चोपराम गोबाडे, प्रकाश काशीवार, मनीराम परशुरामकर, छगन परशुरामकर, विजय लंजे, भीमसेन पर्वते यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.





