गोंदिया,दि.१५ः--राजेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे अपघातग्रस्त महिला रुग्णाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आरोग्य प्रशासनाविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २६ ऑगस्ट २०२६) मुसपार येथील एक महिला रस्ते अपघातात गंभीर जखमी झाली होती. ग्रामस्थांनी तातडीने उपचारासाठी तिला राजेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्याठिकाणी एकही कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.
रुग्णालय कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, त्यावेळेस डॉ. चेतना रहांगडाले यांची ड्युटी असल्याचे सांगण्यात आले. डॉक्टरांना फोनवरून घटनेची माहिती दिल्यानंतरही त्या जवळपास एका तासानंतर रुग्णालयात पोहोचल्या. परंतु, डॉक्टर येण्यापूर्वीच वेळेवर उपचार न मिळाल्याने जखमी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रुग्णालयात रोष व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच रुग्ण कल्याण समितीचे सदस्य जनाब झाकीर खान यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय माहुले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली.
याबाबत विचारणा केली असता वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय माहुले यांनी सांगितले की, “संबंधित वेळेत डॉ. चेतना रहांगडाले यांची ड्युटी होती, मात्र त्या उपस्थित नव्हत्या. या निष्काळजीपणाबद्दल त्यांना ‘कारण दाखवा’ (Show Cause) नोटीस बजावण्यात येत असून, त्यांच्याकडून लेखी स्पष्टीकरण मागवले जाईल. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पुढील योग्य कारवाई करण्यात येईल.”





