ध्वनी प्रदुषण झाल्यास कडक कारवाई करण्याचे निर्देश
गोंदिया, दि. 14 : जिल्ह्यात गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात येत आहे. सार्वजनिक गणपती मंडळे, ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम तसेच घरगुती गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच ध्वनी प्रदुषण नियंत्रणाकरीता पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
वर्ष २०२६ मध्ये ७०० सार्वजनिक गणपती मंडळे, ४४५ ‘एक गाव एक गणपती’ आणि ५ हजार ९५० खाजगी गणपतींची स्थापना होण्याची संभाव्यता आहे. जिल्ह्यातील १६ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील उपलब्ध माहितीनुसार, यंदा सार्वजनिक गणपती मंडळांच्या संख्येत चारने, ‘एक गाव एक गणपती’ उपक्रमातील गणपतींच्या संख्येत पाचने, तर खाजगी गणपतींच्या संख्येत २० ने वाढ होण्याचा अंदाज आहे.
गणेशोत्सव काळात पर्यावरण संरक्षण कायदा सन 1986 व ध्वनी प्रदुषण अधिनियम 2000 च्या तरतुदीनुसार औद्योगिक परिक्षेत्रात 75 डेसिबल, रहिवासी वस्तींमध्ये 65 डेसिबल आणि सार्वजनिक रुग्णालयाच्या परिसरात 55 डेसिबल पेक्षा अधिक ध्वनी नसावा. या नियमांचे पालन न केल्यास पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
यासोबतच ज्या-ज्या भागात आवाजाविषयी दिलेल्या नियमाप्रमाणे डि.जे.चा आवाज असणे अत्यावश्यक आहे. परंतु या पलीकडे आवाजात वाढ झाल्यास तात्काळ संबंधित मंडळ व डि.जे. चालक-मालक यांचेवर कायदेशिर कारवाई करण्यात येईल. डि.जे.च्या कर्कश आवाजाणे लोकांच्या जीवनशैलीवर परिणाम होणार नाही तसेच गणेश उत्सव रॅली दरम्यान लेझर लाईट, मिड मिक्सर व मिक्सर लाईटचा वापर होणार नाही याबाबतही कडक निर्देश देण्यात आले आहे.
गणेशोत्सव हा जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उत्सवाच्या कालावधीत विविध ठिकाणी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विसर्जन मिरवणुका आयोजित करण्यात येतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक शांतता यांना प्राधान्य देत पोलीस व प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे.
सार्वजनिक गणपती मंडळांनी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने प्रशासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे पालन करावे. मंडळांनी ध्वनिक्षेपकाचा वापर, मिरवणुका, वाहतूक, मंडप व्यवस्था, विद्युत सुरक्षेसह इतर आवश्यक बाबींची काळजी घ्यावी. तसेच ‘एक गाव एक गणपती’ उपक्रमातून सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि शांततेचा संदेश देत उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात अफवा, आक्षेपार्ह संदेश अथवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या माहितीवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. कोणतीही अनुचित घटना किंवा संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास तत्काळ संबंधित पोलीस यंत्रणेला माहिती द्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी नागरिकांनी पर्यावरणास अनुकूल गणेशमूर्तींचा वापर करावा. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखावी तसेच गणेशमूर्ती विसर्जनासाठी प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या विसर्जनस्थळांचा वापर करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
गणेशोत्सव हा आनंद, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करून शांतता, सुरक्षितता व सामाजिक सलोखा कायम राखत उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा, असे आवाहन पोलीस व जिल्हा प्रशासनाने केले आहे.





