गोंदिया:तालुक्यातील रजेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. सुप्रिया बोरकर यांच्या कारभाराविरोधात स्थानिक नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. डॉ. बोरेकर यांच्यावर कर्तव्यात कसूर करणे, मुख्यालयी वास्तव्यास नसणे आणि रुग्णांशी गैरवर्तन करण्याचे गंभीर आरोप करत नागरिकांनी थेट जिल्हा शल्यचिकित्सकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार वैद्यकीय अधिकारी डॉ. बोरकर यांच्या सततच्या गैरहजेरीमुळे रुग्णांना वेळेवर योग्य उपचार मिळत नाही.अनेकदा रुग्णांवर रुग्णालयात उपचार न करता त्यांना थेट इतर ठिकाणी रेफर केले जाते, असा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे रुग्णांच्या नोंदी आणि रुग्णालयातील रेफरल रजिस्टरची कसून तपासणी करावी, अशी मागणी तक्रारदारांनी लावून धरली आहे. याशिवाय, उपचार मिळवण्यासाठी येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी डॉ. बोरकर यांनी असभ्य वर्तन आणि आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीवर आता गोंदिया जिल्हा आरोग्य प्रशासन यावर काय पाऊल उचलते आणि चौकशीत काय समोर येते, याकडे संपूर्ण रजेगाव परिसराचे लक्ष लागले आहे.
आंदोलनाचा इशारा
आरोग्य सेवेसारख्या संवेदनशील क्षेत्रात हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संजय जुगराज पटले,आशिष पटले,कन्हैयालाल महिपाल ठाकूर,सागरदिप कामडे,विक्रम सिंह मानेकर,सुनिल वंजारी,धर्मेंद्र पटेल,मोहरम अली,अजय कुंजाम,इनेश पटले,रोहित ठाकूर,शमसुद्दिन सैयद, भरत बिसन यांनी निवेदनातून दिला आहे.





